प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणारी ईसीजी मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:44 AM2021-09-22T04:44:12+5:302021-09-22T04:44:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील सर्व ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना इसीजी मशीन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आरोग्य समिती सभेत ...

ECG machines available to primary health centers | प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणारी ईसीजी मशीन

प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणारी ईसीजी मशीन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील सर्व ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना इसीजी मशीन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आरोग्य समिती सभेत घेण्यात आला. यामुळे ग्रामीण भागातीलही रुग्णांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान, बांधकाम समितीच्या सभेतही विविध निर्णय घेण्यात आले.

जिल्हा परिषदेत मंगळवारी आरोग्य आणि बांधकाम समितीची मासिक सभा झाली. उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या अध्यक्षतेखाली या सभा पार पडल्या. या सभेला प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, सदस्य बापूराव जाधव, दत्ता अनपट, डॉ. अभय तावरे यांच्यासह विभागांचे अधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित होते.

आरोग्य समितीच्या सभेत २३ ऑगस्टला झालेल्या सभेचा कार्यवृत्तात वाचून कायम करण्यात आला. तसेच त्यावेळी झालेल्या ठरावावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, जन्म-मृत्यू नोंदणी, स्त्री-पुरुष प्रमाण, साथरोग, कोरोना आदींचा आढावा घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या बांधकामांचीही सभेत माहिती घेण्यात आली.

या सभेत उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी आरोग्य विभागाला सूचना केली. जिल्ह्यात कोरोना लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ८० टक्के झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाची लसही योग्य प्रमाणात येत आहे. त्यामुळे लस मिळण्याबाबात कोणतीही अडचण नाही. लसीकरण १०० टक्के होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही जनजागृती करण्याची गरज आहे, असे विधाते यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर आरोग्य विभागाला नवीन कायमस्वरूपी ४४ डॉक्टर मिळालेत. त्यामुळे यंत्रणेवर ताण येणार नाही. तरीही जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहून काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

बांधकाम समितीच्या सभेत २०२०-२१ मधील सर्व कामे पूर्ण करावीत. २०२१-२२ वर्षातील ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. तरीही अशी कामे आगामी निवडणुकीच्या आचारसंहितापूर्वी मार्गी लावावीत, अशी सूचनाही उपाध्यक्ष विधाते यांनी यावेळी केली.

.....................................................

Web Title: ECG machines available to primary health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.