औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणाला ग्रहण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:03 AM2021-01-08T06:03:14+5:302021-01-08T06:03:14+5:30
खंडाळा : तालुक्यात दशकापूर्वी औद्योगिक वसाहतीने पाय रोवले. खंडाळा, शिरवळ, केसुर्डी, धनगरवाडी, अहिरे, लोणंद या परिसरात औद्योगिक वसाहती निर्माण ...
खंडाळा : तालुक्यात दशकापूर्वी औद्योगिक वसाहतीने पाय रोवले. खंडाळा, शिरवळ, केसुर्डी, धनगरवाडी, अहिरे, लोणंद या परिसरात औद्योगिक वसाहती निर्माण होऊ लागल्या. यासाठी तालुक्यातील सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्र औद्योगिक वसाहतीसाठी संपादित करण्यात आले.
परंतु सहा टप्प्यांचे नियोजन असलेली एमआयडीसी तिसऱ्या टप्प्यातच अडखळली आहे. उद्योगवाढींच्या धोरणांचा अभाव व भूसंपादनाच्या जाचक अटींमुळे औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणाला ग्रहण लागले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीच्या वाढीसाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.
तालुक्यात एमआयडीसीची उभारणी करण्यात आली. त्यामुळे कधीकाळच्या कवडीमोल दराच्या जमिनींना लाखोंचा भाव मिळाला. सध्या तालुक्यात तीन टप्प्यांत कारखानदारी विस्तारली आहे. असूनही तीन टप्पे होणे बाकी आहे. पहिल्या तीन टप्प्यांतच छोट्या-मोठ्या सुमारे एकशे वीस कंपन्यांनी आपले बस्तान बसविले आहे. यात केसुर्डीच्या विशेष आर्थिक क्षेत्राचाही (सेझ) समावेश आहे. वास्तविक सुमारे सहाशे कंपन्यांचे उभारणीचे नियोजन आहे. सध्या तालुक्यात एशियन पेंट, निप्रो, रिएटर, पारी, परांजपे, गोदरेज, डॅटवायलर, थरमॅक्स, टीबीके, मोल्ड टेक पॅकेंजिंग, क्यू बिल्ट, राज प्रोसेस, एसीजी फार्मा, भारत गियर, सोना अलायन्स, रेवती इंडस्ट्रीज, हायटेक प्लास्टो, एमटीके, अष्टविनायक ग्लास यासारख्या शेकडो कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र कारखान्यांचे जाळे निर्माण झाले असले तरी उर्वरित कंपन्या कधी पाय रोवणार हे सुद्धा महत्त्वाचे आहे.
तालुक्यात कारखानदारी वाढू लागली तशी त्यासाठी जमिनींची मागणी सुद्धा वाढली. साहजिकच त्यामुळे जागेच्या उपलब्धतेसाठी संघर्ष होऊ लागला आहे. खरेतर ज्या जमिनी शेतीसाठी विकसित होऊच शकत नाहीत, अशा जागा विकण्यावर शेतकऱ्यांचा कटाक्ष राहिला; पण याचे प्रमाण वाढताच काही गावातून शेतकरी अल्पभूधारक झाला. त्यामुळे बागायती क्षेत्रात भूसंपादनाला विरोध वाढू लागल्याने कंपन्यांना जागा मिळणे अवघड बनले आहे. विशेषतः तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यात असलेल्या सात गावांतील शेतकऱ्यांनी जमिनीवर पडलेले शिक्के काढण्यासाठी सरकार दरबारी मोठा संघर्ष केला होता. त्यात त्यांना यशही मिळाले. त्यामुळे या वसाहतीच्या आणखी विस्तारासाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यातच खंडाळा एमआयडीसीला पूरक म्हणून पुरंदर तालुक्यात नियोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय विमानळाचाही मुहूर्त ठरत नसल्याने तालुक्यातील इतर कंपन्यांची उभारणी ठप्प आहे. त्यामुळे औद्योगिक विस्तारासाठी यावर मार्ग निघणे आवश्यक आहे.
चौकट..
आर्थिक मंदीचा फटका ...
कोरोनामुळे देशात सुरू असलेल्या आर्थिक मंदीचा परिणाम उद्योग क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक कारखान्यांत उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. अनेक कारखाने महिन्यातून काही दिवस बंद राहतात. नवीन कारखानदारांनी या वसाहतीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे रोजगाराचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार विस्तारीकरणाचे प्रयत्न झाल्यास मोठे उद्योग तालुक्यात येऊ शकतात.
......................................