हजारो हातांनी बनविले पर्यावरणपूरक आकाशदिवे
By admin | Published: October 25, 2016 11:09 PM2016-10-25T23:09:18+5:302016-10-26T00:20:03+5:30
पाचवडमध्ये कार्यशाळा : स्वनिर्मितीचा आनंद घेत असतानाच अनेक दिव्यांची विक्रीही
पाचवड : कोणत्याही परंपरेला आधुनिकतेची जोड दिली तर तो सण उत्सव बनतो. दिवाळीचंही तसंच आहे. दिवाळीत प्रत्येकांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. बाजारात विकत मिळत असलेल्या आकाशदिव्यांमध्ये प्लास्टिकचा वापर होतो. यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचतो. त्यामुळे विकत आकाशदिवे आणण्याऐवजी स्वत:च बनवा स्वत:चा आकाशदिवा. ही संकल्पना घेऊन पाचवडमध्ये कार्यशाळा घेतली. यात हजारो हातांनी स्वनिर्मितीचा आनंद घेतला.
येथील महात्मा गांधी विद्यालय, ज्युनिअर कॉलेज व भुर्इंज-पाचवड पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पाचवड ग्रामपंचायतीच्या प्रांगणात पर्यावरण जागरूकता, स्वदेशी हस्तकला जतन व फटाकेमुक्त दिवाळी ही कृतियुक्त शिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत पर्यावरणाला जपण्याचे काम पाचवड येथील महात्मा गांधी विद्यालयातील कला शिक्षक प्रदीप कुंभार यांच्या संकल्पनेतून व भुर्इंज-पाचवड पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसत होता.
एका तासाच्या कार्यशाळेत चिमुकल्यांच्या हातांनी हजारो आकाशकंदील तयार करून गावातीलच सर्व ग्रामस्थांना विकले. शालेय शिक्षणाबरोबरच आपल्या मुलांमधील या अनोख्या कलागुणांना पाहून उपस्थित सर्व पालक व ग्रामस्थही गहिवरून गेले. या कार्यशाळेत पाचवी ते दहावीपर्यंतचे सुमारे साडेचारशे विद्यार्थी व सर्व शिक्षकवर्ग सहभागी झाले होते.
कार्यशाळेस पाचवड ग्रामपंचायतीचे सरपंच महेश गायकवाड, भुर्इंजचे सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, ग्रामपंचायतीचे सदस्य भरत गायकवाड, मुख्याध्यापक बी. जी. कणसे, नवलाई पतसंस्थेचे संचालक अशोक गायकवाड, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष विजय गायकवाड, आपुलकी मतिमंद शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा पवार, वर्षा गायकवाड, राहुल तांबोळी, विलास साळुंखे, महेंद्र गायकवाड, संजय भाडळकर, सचिन इथापे, कृष्णात घाडगे, महादेव पाटील, शाळेचा सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एका तासात एक हजार आकाशकंदील
कार्यशाळेत सहभागी झालेल्या ४५० विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून सुमारे एक हजार आकाशकंदील तयार केले. साताऱ्यातून रंगीबेरंगी कागद उपलब्ध करून ते विद्यार्थ्यांना देऊन त्यापासून पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्यात आले. कला शिक्षक प्रदीप कुंभार यांनी प्रात्यक्षिक दाखवून वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील मुलांकडून तयार करून पाचवड गावामध्येच त्यांची विक्री केली. विक्रीतून आलेले पैसे आकाशकंदील तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांना व्यावसायिकतेचे धडेही दिले. तसेच आलेल्या पैशातून सर्व विद्यार्थ्यांनी स्वकष्टावर पर्यावरणपूरक पद्धतीने फटाकामुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञाही घेतली.
पालकही गहिवरले
पाचवडचे आधारस्तंभ दिवंगत विठ्ठलराव गायकवाड यांच्या पश्चात सुमारे पंधरा वर्षांनंतर महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा अशाप्रकारचा कार्यक्रम प्रथमच गावामध्ये घेण्यात आला. त्यामुळे सर्व ग्रामस्थांमध्ये एकच उत्सुकता होती. कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचा उत्साह पाहून व आपल्या पाल्याच्या कलागुणांना पाहताना पालकही गहिवरून गेले.