आठ महिन्यांनी खाद्यतेल स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 AM2021-06-19T04:25:40+5:302021-06-19T04:25:40+5:30
सातारा : जिल्ह्यात मागील आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले होते. पण, मागील आठवड्यापासून दरात उतार आला आहे. तर शेंगदाणा ...
सातारा : जिल्ह्यात मागील आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले होते. पण, मागील आठवड्यापासून दरात उतार आला आहे. तर शेंगदाणा तेल डब्यामागे जवळपास ३०० रुपये कमी झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी दीपावलीपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत गेले. तेलाचे पाऊच तसेच १५ किलोंच्या डब्याचेही दर सतत वाढत होते. एक लिटरच्या खाद्यतेल पाऊचची किंमत ९० रुपयांच्या घरात होती. हेच तेल काही दिवसांपूर्वी पर्यंत १८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्याचबरोबर खाद्यतेलाचा १५ किलोच्या डब्याचे भाव २८०० रुपयांपर्यंत पोहोचलेले. यामध्ये पामतेल आणि सोयाबीन तेलाचा भाव सूर्यफूल व शेंगदाणा तेलापेक्षा कमी होता. असे असले तरी खाद्यतेलाचे दर वाढल्यानंतर नागरिकांनी सोयाबीन तेलाला पसंती दिली. पण, सोयाबीन तेलाला मागणी वाढल्यानंतर याच्या दरातही वाढ झाल्याचे दिसून आले.
खाद्यतेलाचे दर सध्या कमी होत असल्याचे दिसून आले. मागील आठवड्यापासून पाऊचमागे कमी उतार असला तरी डब्याचा भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे महागाईशी तोंड देणाऱ्या सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत झाली आहे. येथून पुढे खाद्यतेलाचे दर आणखी कमी होऊ शकतात, असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यातच लवकरच नवीन तेल पिके येणार आहेत. त्यामुळे काही महिन्यांतच आणखी दर कमी होण्याची शक्यता आहे.
चौकट :
खाद्यतेलाचे दर (प्रतिलिटर)
खाद्यतेल आधीचे आताचे
सूर्यफूल १०० १८०
सोयाबीन ९० १५५
शेंगदाणा १४० १८०
पाम ८० १२२
.........................................
सोयाबीन तेल डबा २४००
सूर्यफूल तेल डबा २६००
.......................................
गृहिणींचे बजेट कोलमडलेले...
मागील आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढलेले आहे. ज्या खाद्यतेलाचा एक लिटरचा पाऊच ८० ते ९० रुपयांना मिळत होता, तो १५० रुपयांच्या पुढे गेलेला. त्यातच कोरोना लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्यांची कामे गेली. त्यांच्या घरात या महागाईची फोडणी चांगलीच बसली. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले. त्याचबरोबर सामान्यांना आर्थिक फटकाही मोठ्या प्रमाणात बसला.
...............................................
शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल...
दहा वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही शेतात कारळ, भुईमूग पिके घ्यायचो. यामधून घाण्यावर जाऊन तेल काढून घेत होतो. पण, अलीकडील काळात तेलपिके कमी प्रमाणात घेत आहे. त्यामुळे सध्या विकतचे खाद्यतेलच घेत आहोत. पण, महागाईमुळे हे परवडत नाही.
- बापू काळे, शेतकरी
....................
पूर्वीच्या काळी घाण्यावर भुईमूग शेंगा घेऊन जात होतो. त्यामधून तेल तयार करण्यात येत होते. हे खाद्यतेल वर्षभर वापरायचो. हे तेल पुरेसे होत होते. पण, अलीकडील काळात तेलपिकांपेक्षा फळबागांकडे वळलो आहे. त्यामुळे बाजारातून विकतचे खाद्यतेल घेऊन तेच घरात वापरतो.
- तानाजी पाटील, शेतकरी
.............................................................