शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी दोन वर्ष लागतील; सुरज मांढरे यांची माहिती
By प्रगती पाटील | Updated: September 22, 2023 13:56 IST2023-09-22T13:55:52+5:302023-09-22T13:56:01+5:30
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंती निमित्त कार्यक्रमात प्रतिपादन

शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी दोन वर्ष लागतील; सुरज मांढरे यांची माहिती
सातारा : भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होण्याची गरज आहे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा सुरू आहे. संपूर्ण शैक्षणिक धोरण बदलणे ही फार मोठी प्रक्रिया असून या प्रक्रियेला विविध पातळ्यांवरून हिरवा कंदील मिळून त्याची अंमलबजावणी होण्यासाठी अजून किमान दोन वर्षे लागतील असे प्रतिपादन शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मांढरे बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख यांच्यासह रयत सेवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन दळवी यांनी हंगामी शिक्षकांसह बीएड शिक्षकांच्या मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा केली. राज्यभरात रयतच्या ज्या शाळा भाडेपट्ट्यावर आहेत त्या जमिनी स्वमालकीच्या करण्यासाठी रयत प्रयत्नशील असल्याचे सांगितले. आधुनिक जगाला भिडण्यासाठी प्राथमिक वर्गांपासूनच स्पोकन इंग्लिश प्रशिक्षणाचे धडे रयतच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठीही रयत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.