कऱ्हाडात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:03 AM2021-05-05T05:03:54+5:302021-05-05T05:03:54+5:30
कऱ्हाड शहरात कोल्हापूर नाका, भेदा चौक, विजय दिवस चौक, कृष्णा नाका, कृष्णा कॅनॉल या ठिकाणी मंगळवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात ...
कऱ्हाड शहरात कोल्हापूर नाका, भेदा चौक, विजय दिवस चौक, कृष्णा नाका, कृष्णा कॅनॉल या ठिकाणी मंगळवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विनाकारण, नाहक फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू असणारी अत्यावश्यक सेवेतील दुकानेही मंगळवारपासून बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र तरीही अनेक जण या ना त्या कारणांसाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक ठिकाणी कडक नाकाबंदी केली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांच्या शेकडो दुचाकी जप्त केल्या आहेत. अनेक वाहनधारकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, कोल्हापूर नाका येथे नाकाबंदी सुरू असताना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करून पुन्हा तपासणी मोहीम सुरू केली. शहरात अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आवाहनही करण्यात आले आहे.
फोटो : ०४केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने मंगळवारी जप्त केली.