अन्नातील खते अन् जंतुनाशकाचा स्त्री बीजावर परिणाम
By प्रगती पाटील | Published: November 9, 2024 07:23 PM2024-11-09T19:23:47+5:302024-11-09T19:24:22+5:30
सातारा : सकस आहाराच्या नावाखाली दैनंदिन आयुष्यात ताटात येणाऱ्या अन्नात असलेली खते आणि जंतुनाशके स्त्री बीज निर्मितीवर परिणाम करत ...
सातारा : सकस आहाराच्या नावाखाली दैनंदिन आयुष्यात ताटात येणाऱ्या अन्नात असलेली खते आणि जंतुनाशके स्त्री बीज निर्मितीवर परिणाम करत आहेत. कमी गुणवत्ता असलेल्या स्त्री बीजामुळे गर्भ खराब होवुन गर्भपात होण्याची शक्यता बळावते आहे.
गर्भ खराब होण्याचे प्रकार टाळायचे असतील तर पालकत्वाचा विचार करणाऱ्या जोडप्याने आहारात बदल करणे आणि खात्रीशीर उपचार घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातून बाहेर महानगरांमध्ये स्थिरावलेल्या जोडप्यांना गर्भ राहत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनुवांशिकता नसतानाही असे प्रकार होण्यामागे महानगरांमध्ये खते आणि जंतुनाशकाचा मारा असलेले अन्न कारणीभूत आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘लो एएमएच’ असे संबोधले जाते. पूर्वी ४५ ते ५० वयात पाळी जायची, आता स्त्री बीज लवकर संपल्यास हे दोष दिसू शकतात.
तर टेस्ट ट्युब बेबीचा पर्याय
गर्भधारणा होत नसल्यास अद्यावत उपचार घेवून लवकर गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जातात. यामध्ये गुणवत्ता चांगली होण्यासाठी काही आैषधांचा वापर केला जातो. स्त्री बीज संख्या एकदा संपली की ती पुन्हा वाढत नाही. किती प्रमाणात संख्या कमी आहे त्यावरून उपचार ठरवले जातात. जास्त प्रमाणात स्त्री बीज कमी असल्यास टेस्ट ट्युब बेबीचा वापर करून गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न केला जातो.
ट्रायसोमीचे हे आहेत प्रकार
कमी गुणवत्ता असलेल्या स्त्री बीजामुळे सारखा गर्भ खराब होवू शकतो. जास्त खराब गुणवत्ता असल्यास तो गर्भ मध्ये ट्रायसोमी विकार असू शकतात. यामध्ये मुल जन्माला आल्यास ते मतिमंद होवू शकते. यासाठी गर्भधारणा झाल्यानंतर डबल, ट्रीपल क्वाड्रप्ल मार्कर, एनटी स्कॅन आदी तपासणी करून गर्भ निरोगी आहे का ते तपासून घेणे महत्वाचे ठरते.
कमी वयात गर्भ खराब होण्याच्या तक्रारी अलिकडे वाढलेल्या दिसतात. आनुवंशिकता, आहारातील बदल, जंक फूड, खते आणि जंतुनाशकाचा वापर केलेले अन्न, वातावरण बदल अशी काही कारणे आहेत. गर्भधारणेसाठी अडसर ठरत असलेल्या या गोष्टींबाबत जोडप्याने चाैकस असणे गरजेचे आहे. अद्यावत तपासणी आणि उपचार केल्यास निरोगी गर्भधारणा होण्यास मदत होते. - डाॅ. आर. एस. काटकर, आयव्हीएफ तज्ज्ञ