सुभेदार रामजी आंबेडकर स्मारकासाठी प्रयत्नशील : गुदगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:08+5:302021-01-16T04:43:08+5:30
मायणी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या देखरेखीखाली १८९० रोजी येथील ब्रिटिशकालीन तलावाचे ...
मायणी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या देखरेखीखाली १८९० रोजी येथील ब्रिटिशकालीन तलावाचे काम करण्यात आले. तलाव परिसरात सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मृतींचे जतन होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मायणीचे सरपंच सचिन गुदगे यांनी दिली.
मायणी येथील ब्रिटिशकालीन तलाव फ्लेमिंगोसह सुमारे तीनशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. या तलाव परिसराचा राखीव पक्षी संवर्धन क्षेत्र म्हणून शासनामार्फत विकास होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले चरित्रकार लेखक चांगदेव खैरमोडे यांनी लिहिलेल्या चरित्र खंडातील संदर्भीय पुराव्यावरून तलाव बांधणीबाबत माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मृतींचे तलाव परिसरात जतन व्हावे, अशी अपेक्षा मायणी येथील पत्रकार बांधवांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी उपसरपंच आनंदा शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य विजय कवडे, जगन्नाथ भिसे, सूरज खांडेकर, अरुण सुगदरे आदी उपस्थित होते.