तरुणाईच्या प्रयत्नांमुळे वणव्याला अटकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:05 AM2021-02-05T09:05:53+5:302021-02-05T09:05:53+5:30
खंडाळा : खंबाटकी घाटाजवळील हरेश्वर डोंगराला वाण्याचीवाडीनजीक लागलेल्या वणव्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. हा वणवा मोठ्या प्रमाणात ...
खंडाळा : खंबाटकी घाटाजवळील हरेश्वर डोंगराला वाण्याचीवाडीनजीक लागलेल्या वणव्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. हा वणवा मोठ्या प्रमाणात पसरू लागल्याने पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी खंडाळ्यातील हरेश्वर संवर्धन ग्रुपचे सर्व तरुण धावून गेले.
पर्यावरण संतुलन आणि संवर्धन ही भविष्याची गरज ओळखून खंडाळ्यातील हरेश्वर संवर्धन संघटनांच्या सदस्यांनी तीन वर्षांपासून पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतले आहेत.
पाणवठे तयार करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहेत. या ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांना पाण्याचा पुरवठा करून पर्यावरण संवर्धनासाठी तरुणाई काम करत आहे, अशा परिस्थितीत डोंगराला आग लागल्याने पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. मानवाचे जीवन सुसह्य करावयाचे असल्यास पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन डोंगरातील आग विझविण्यासाठी संदीप ननावरे, गणेश गाढवे, मयूर शिर्के, मुकेश पटेल, शिरीष गाढवे यांसह सर्व तरुणांनी झोकून दिले. झाडांच्या फांद्यांचा वापर करून त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून हवा फवारणी मशीनद्वारे वणवा पूर्णपणे विझविण्यासाठी प्रयत्न केले.
फोटो
३१खंडाळा-वणवा
खंडाळा तालुक्यातील वाण्याचीवाडीनजीकच्या डोंगराला शनिवारी वणवा लागला होता. हरेश्वर संवर्धन ग्रुपच्या सदस्यांनी तो विझविला.