हद्दवाढीसह मागासवर्गीय वस्त्यांसाठी सव्वा आठ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:41 AM2021-02-11T04:41:21+5:302021-02-11T04:41:21+5:30
सातारा : जिल्हा नागरी दलित वस्ती योजना अंतर्गंत सातारा नगरपरिषदेला सव्वा आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. ...
सातारा : जिल्हा नागरी दलित वस्ती योजना अंतर्गंत सातारा नगरपरिषदेला सव्वा आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. या निधीतून हद्दवाढीतील भागासह विविध ठिकाणच्या मागासवर्गीय वस्त्यांमध्ये रस्ते, गटर्स, संरक्षक भिंत आदी लोकोपयोगी व मूलभूत विकासकामे लवकरच हाती घेऊन पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, जिल्हास्तरावरील जिल्हा नागरी दलित वस्ती योजनेमधून सातारा नगरपरिषदेस मोठा निधी मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेल्या सहकार्यामुळे नगरपरिषदेस मोठा निधी मिळाला. वाढीव हद्दीसह सातारा शहरात मागासवर्गीय वस्त्या आहेत. येथे मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत. नगरपरिषदेच्या माध्यमातून पाच टके राखीव निधीसह सर्वसाधारण निधी विनियोगात आणून अनेक कामे मार्गी लावली आहेत. उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गंत सुमारे सव्वा आठ कोटींचा निधी नगरपरिषदेला मिळालेला आहे. लवकरच सातारा शहरातील वाढीव भागासह मागासवर्गीय वस्त्यांमधील मूलभूत प्रश्न व विकासकामे मार्गी लावली जातील.
(चौकट)
अत्यावश्यक ठिकाणी
सिग्नल यंत्रणा उभारा
हद्दवाढ झालेल्या भागासह साताऱ्यातील महत्त्वाची महाविद्यालये, रुग्णालय, शासकीय आस्थापना यांसह महत्त्वाच्या चौकांमध्ये नागरिकांच्या सुरक्षितेकरीता गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग, कॅट आय मार्किंगची कार्यवाही तातडीने करावी आणि आवश्यकतेप्रमाणे प्रमुख ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यात यावी, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा नगरपरिषदेला केल्या आहेत.