आठ जनावरे आगीत होरपळली
By admin | Published: January 26, 2016 12:51 AM2016-01-26T00:51:39+5:302016-01-26T00:51:39+5:30
येणपेतील घटना : आग विझविताना एकजण जखमी
उंडाळे : कऱ्हाड तालुक्यातील येणपे-चोरमारवाडी येथे जनावरांच्या शेडला आग लागल्यामुळे ८ जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. आगीत सुमारे २ लाखांचे नुकसान झाले असून, आग विझवताना शेडचे मालक विष्णू चोरमारे हेसुद्धा जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चोरमारवाडी-येणपे येथील विष्णू अण्णा चोरमारे व यशवंत आबा चोरमारे यांचे राहत्या घराशेजारी जनावरांचे शेड आहे . या शेडमध्ये सहा म्हशी, एक गाय व खिलार वासरू बांधले होते. दोन्ही कुंटुबातील लोक जेवण करून झोपले होते. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास जनावरांच्या शेडला अचानक आग लागल्याने जनावरांनी जोरदार हंबरडा फोडला.
दरम्यान, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे जनावरांचा चारा व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत आठ जनावरे ७० टक्यांहून अधिक भाजली. यावेळी आग शमविण्यासाठी गेलेले विष्णू चोरमारे यांचा चेहरा भाजला असून, त्यांच्यावर उंडाळे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेनंतर गावकामगार तलाठी जी.एच. धराडे व रमेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जळिताचा पंचनामा केला. या आगीत सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे . (वार्ताहर)
सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत
येळगाव व परिसरातील परगावी असणारे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत आहेत . परगावी असणाऱ्यांना आपला गावात, परिसरात काय घटना घडली तर सोशल मीडियाच्या माध्यमातून समजते. चोरमारवाडी येथील घटना घडल्यानंतर रमेश शेटे यांच्यासह ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या ग्रुपवरील शंभर जणांकडून प्रत्येकी शंभर रुपये काढून जमा झालेली दहा हजारांची रक्कम जळीतग्रस्तांना मदत म्हणून दिली.