आठ जणांची कोरोनावर मात; तरी महिनाभरापासून रुग्णालयात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:59+5:302021-07-18T04:27:59+5:30
सातारा : कोरोनातून मुक्त झाल्यानंतर अनेकांना आता वेगवेगळे आजार होऊ लागले आहेत. म्यूकरमायकोसीस आजाराचे रुग्ण कमी होऊ लागलेत मात्र, ...
सातारा : कोरोनातून मुक्त झाल्यानंतर अनेकांना आता वेगवेगळे आजार होऊ लागले आहेत. म्यूकरमायकोसीस आजाराचे रुग्ण कमी होऊ लागलेत मात्र, किडनी, ॲपेडिक्स, हरर्णिया, पॅरालिसीस या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. यातील ८ रुग्ण गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कोरोनासारख्या महाभंकर महामारीतून बचावल्याचा आनंद काहींच्या चेहऱ्यावर फार काळ टिकला नाही. जिल्ह्यात असे बरेच रुग्ण असतील मात्र, सध्या प्रशासनाच्या नोंदवहीत आठ रुग्णांची नोंद झालीय. या रुग्णांपैकी काहींना किडनीचा विकार तर काहींना पोटाचे विकार उदभवले आहेत. सुरुवातीला काही रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आले होते. मात्र, संबंधित रुग्णांनी त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेणे पसंत केले. यातील काही रुग्णांवर वीस दिवसांपासून तर काही रुग्णांवर आठ दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाचे दुष्परिणाम तर नाही ना, याचा वैद्यकीय पथक शोध घेतेय.
पोस्ट कोविडचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना
अनेक वयोवृद्ध कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागलाय. घशात खवखवणे, ताप येणे, मळमळणे, भूक न लागणे अशी लक्षणे या वृद्धांना सुरू झालीत. जिल्हा शासकीय रुग्णालयात पोस्ट काेविडचे सात रुग्ण उपचार घेत आहेत. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत.
कोरोनातून बरा...पण श्वसनाचा त्रास सुरू
nकोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना आता श्वसनाचा त्रास सुरू झालाय. त्यामुळे अनेक जण रुग्णालयात धाव घेत आहेत.
n आठ रुग्णांपैकी चार जणांना पोटदुखीचा त्रास सुरू झालाय
nएका रुग्णाला किडनीचा त्रास जाणवू लागला आहे. आणखी रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
बरे झाल्यानंतरही घ्या काळजी...
nकोरोनातून बरे झाल्यानंतर काळजी घेतली पाहिजे. तोंडाला सतत मास्क लावणे गरजेचे आहे.
nगर्दीच्या ठिकाणी जाणे कटाक्षाणे टाळावे. सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवावेत.
nताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.
कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेकांना कोरोना होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्याला कोरोना पुन्हा होणार नाही, अशा गैरसमजुतीमध्ये राहू नये. आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जे रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यांना कोरोनाचा साईड इफेक्ट झाला आहे, असे म्हणता येणार नाही.
डाॅ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा