साताऱ्यात डेंग्यूचे आठ रुग्ण, सतर्कता बाळगण्याचे आवाहन : हिवताप विभागाकडून सर्वेक्षण

By सचिन काकडे | Published: June 20, 2024 10:02 PM2024-06-20T22:02:22+5:302024-06-20T22:02:30+5:30

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया असे आजार डोके वर काढतात.

Eight cases of dengue in Satara, call for vigilance: survey by Hivatara department | साताऱ्यात डेंग्यूचे आठ रुग्ण, सतर्कता बाळगण्याचे आवाहन : हिवताप विभागाकडून सर्वेक्षण

साताऱ्यात डेंग्यूचे आठ रुग्ण, सतर्कता बाळगण्याचे आवाहन : हिवताप विभागाकडून सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरात डेंग्यू बाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली असून सध्या आठ बाधितांवर शहरातील विविध खाजगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. साथरोगांच्या पार्श्वभूमीवर हिवताप विभागाने विशेष खबरदारी म्हणून शहरात गृहभेटीद्वारे डेंग्यू अळ्यांचा शोध घेऊन त्या नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया असे आजार डोके वर काढतात. यंदादेखील मान्सूनला सुरुवात होताच कोरेगाव व सातारा तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या सातारा शहरात डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या आठवर पोहोचली असून, या रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. हिवताप विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून सातारा शहरात गृहभेटीद्वारे सर्वेक्षण सुरू केले आहे. या कामी आशासेविका व आरोग्यसेविकांच्या तीन पथकांनी नेमणूक करण्यात आली असून, या पथकांद्वारे दररोज ३०० घरांना भेटी देऊन नागरिकांच्या आरोग्याच्या नोंदी घेणे, घरातील पाण्याच्या कंटेनरची तपासणी करून डेंग्यू अळ्यांचा शोध घेणे, डेंग्यू अळ्या आढळून आल्यास कंटेनर मोकळे करून अळ्या नष्ट करणे, ॲबेटिंग करणे अशी कामे गतीने केली जात आहे. या पथकांनी शहरातील सदर बझार, लक्ष्मीटेकडी, मतकर झोपडपट्टीकडे विशेष लक्ष दिले असून, येथे तपासणी मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे.

८४ प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी
आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यू तपासणीची मोफत व्यवस्था उपलब्ध केली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना सांधेदुखी, ताप, कणकणी, अशक्तपणा असा त्रास जाणवत आहे, त्यांनी आजार अंगावर न काढता तातडीने डेंग्यूची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप विभागाकडून करण्यात आले आहे.
 

Web Title: Eight cases of dengue in Satara, call for vigilance: survey by Hivatara department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.