एरंडाच्या बिया खाल्ल्याने आठ मुले आजारी
By admin | Published: July 14, 2015 12:22 AM2015-07-14T00:22:44+5:302015-07-14T00:22:44+5:30
पिलेश्वरीनगर भागातील घटना : रुग्णालयात उपचार सुरू
सातारा : एरंडाच्या बिया खाल्ल्याने उलट्यांचा त्रास सुरू झालेल्या आठ मुलांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पिलेश्वरीनगर (करंजे) येथील सहा मुलांनी सोमवारी तर दोन मुलांनी रविवारी एरंडाच्या बिया खाल्ल्याने त्यांना त्रास सुरू झाला.
प्रांजल विजय कांबळे (वय १२), शिवराज शंकर राजे (वय १४), तुषार विजय भिसे (वय १२), युवराज मल्हार अडागळे (वय १२), हृषीकेश दत्तात्रय वायदंडे (वय ८, सर्व रा. पिलेश्वरीनगर) ही सहा मुले सोमवारी सकाळच्या सुमारास खेळत होती. त्यावेळी त्यांना एरंडाच्या बिया पडल्याचे दिसले. या मुलांनी त्या बिया खाल्ल्याने त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, देवराज मल्हार भिसे (वय ११) आणि निशांत महादेव भिसे (वय १२) या दोघांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास एरंडाच्या बिया खाल्ल्या होत्या. त्यांनाही त्रास होऊ लागल्याने सोमवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)
आंब्रळ येथील सहा मुलांच्या प्रकृतीत सुधारणा
एरंडाच्या बिया खाल्ल्यामुळे आंब्रळ येथील सहा मुलांना उलट्यांचा त्रास होवू लागला. त्यांना उपचारासाठी पाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोरणा विभागातील आंब्रळ येथे रविवारी (दि. १२) दुपारी साक्षी माने (वय १२), प्रियांका गव्हाणे (११), निकीता मोहिते (४), साक्षी मोहिते (८) सिद्धेश मोहिते (१०) ही सहा मुले गावात खेळत होती. खेळता-खेळता त्यांनी एका झुडपातील एरंडाच्या बिया खाल्ल्या. बिया खाल्ल्याने सर्व मुलांना उलट्यांचा त्रास होवू लागला. यानंतर ग्रामस्थांनी सर्व मुलांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मुलांची प्रकृती सुधारत असल्याने ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.