सोनगावमध्ये आठ दिवस जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:49 AM2021-04-30T04:49:37+5:302021-04-30T04:49:37+5:30
शेंद्रे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी ...
शेंद्रे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी व कोरोना समिती यांनी २८ एप्रिलपासून आठ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत ग्रामस्थांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.
सोनगाव गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमालीने वाढत असल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर गावात कोरोना समितीने आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून सलग आठ दिवस सोनगाव गावातील सर्व दुकानदार, व्यावसायिकांनी कडक लॉकडाऊन पाळावा, असे कोरोना समितीने आवाहन केले आहे. या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवा व औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी यांनाच गावामधून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच गावांमध्ये विनामास्क फिरताना सापडल्यास कोरोना समिती ५०० रुपये दंड करणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.