लस घेण्यासाठी एका व्यक्तीला आठ तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:37 AM2021-03-06T04:37:43+5:302021-03-06T04:37:43+5:30
सातारा: शहरातील विविध रुग्णालयांत वयोवृद्धांना लस देण्यात येत आहे. मात्र, सकाळी साडेदहा वाजेला लस देण्यासाठी आलेली व्यक्ती सायंकाळी ...
सातारा: शहरातील विविध रुग्णालयांत वयोवृद्धांना लस देण्यात येत आहे. मात्र, सकाळी साडेदहा वाजेला लस देण्यासाठी आलेली व्यक्ती सायंकाळी पाचपर्यंत रुग्णालयातच वेटिंगवर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, याची कारणे सर्व्हर डाऊन असल्याची देण्यात येत आहेत.
शहरामध्ये गत काही दिवसांपासून वयोवृद्धांना लस देण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, कस्तुरबा आणि गोडोलीतील नागरी प्राथमिक अरोग्य केंद्रांचा यात समावेश आहे. सध्या उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. त्यामुळे अनेक वृद्धांनी लस घेण्यासंदर्भात नोंद केली होती. अशा वृद्धांना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता बोलवण्यात आले होते. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे या वृद्धांना ताटकळत बसावे लागले. आता सर्व्हर सुरू होईल मग सर्व्हर सुरू होईल, या आशेवर काही वृद्ध तब्बल पाच ते सहा तास ताटकळ बसून होते. ज्यांचे घर रुग्णालयापासून जवळ होते असे लोक घरी गेले. त्यानंतर संध्याकाळी परत आले. परंतु जे वृद्ध लोक लांबून आले होते. अशा वृद्धांना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागला.
वयोवृद्धांना एवढ्या वेळ सध्याच्या वातावरणामध्ये बाहेर पडणे अवघड आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती आणि दुसरीकडे उन्हाचे चटके यामुळे लस न घेतलेलीच बरी, असे समजून अनेक जण घरी जात होते. जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वयोवृद्धांची होणारी ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
चाैकट : नोंदणीची ऑफलाइन प्रक्रियाच बरी...
सर्व्हर सातत्याने डाऊन होत आहे. रोज फक्त शंभर ते दीडशे लोकांनाच लसीकरण केले जात आहे. याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइनऐवजी ऑफलाइन राबविली तर दिवसभरात तीनशे ते चारशे नागरिकांना लसीकरण होऊ शकते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.