खमंग चिवड्यासाठी आठ प्रकारचे पोहे !
By admin | Published: October 22, 2016 12:02 AM2016-10-22T00:02:27+5:302016-10-22T00:02:27+5:30
कर्नाटकातून होतेय आयात : भाजक्या डाळींच्या दरात वाढ
सातारा : दिवाळी का आवडते, हा प्रश्न लहानांना विचारला तर एक उत्तर हमखास मिळेल, ‘दिवाळीत लाडू, चिवडा, चकली खायला मिळते.’ खरंय, बदल्यात जीवनशैलीनुसार गावागावांत गोड पदार्थ कमी खाल्ले जात असले तरी चिवडा हा प्रत्येकाच्या घरात होतोच होतो. खमंग चिवड्यासाठी साताऱ्यात आठ प्रकारचे पोहे आले आहेत.
दिवाळीमध्ये चिवड्याच्या निमित्ताने पोह्यांना मोठी मागणी असल्याने साताऱ्यातील बाजारपेठेत कर्नाटकातून पोहे दाखल झाले आहेत. यामध्ये सुपर, भाजके, दुधी, नायलॉन, पातळ, कांदा, मका, दगडी असे पोहे विक्रीस आले आहेत.
काही घरांमध्ये चिरमुऱ्यांचा चिवडा लागतो तर कोणाच्या घरात दगडी पोह्यांचा. कोणाला कुरकुरीत चिवडा लागतो तर कोणाला तोंडात टाकल्याबरोबर विरगळणारा हवाय. साताऱ्यात दाखल झालेल्या प्रत्येक पोह्याची चव न्यारी आहे. त्यांचा आकार, गुणधर्मानुसार ग्राहक पोह्यांची निवड करतात. सुपर पोहे हे पूर्वापार चालत आलेले असून, त्यांना आजही तशीच मागणी आहे. (प्रतिनिधी)
चिवडा मसाल्यांना मागणी
४आजीच्या काळात चिवडा बनविताना घरातीलच जिरे, मोहरी, कडीपत्ता, हळद, लसूण टाकला जात असायचा; पण आता गृहिणींना वेळ नसल्याने आयता मसाला वापरण्याला पसंती दिली जाते. त्यामुळे अनेक कंपन्यांनी असे तयार मसाले विक्रीस आणले आहेत. त्यांना मागणी वाढत आहे.
भाजकी डाळ आवाक्याबाहेर
चिवडा बनविताना भाजकी डाळ एक आवश्यक घटक असतो. डाळीशिवाय चिवड्याला चवच येत नाही; पण यंदा डाळी टाकताना हात आकडता घ्यावा लागणार आहे. गेल्यावर्षी १२० रुपये किलोने विक्री होत असलेली डाळ आता १८० रुपयांच्या घरात पोहोचली आहे.