अठरा हजार हेक्टर जमीन येणार ओलिताखाली
By admin | Published: July 2, 2017 04:36 PM2017-07-02T16:36:44+5:302017-07-02T16:36:44+5:30
धोम-बलकवडी कालवा : अस्तरीकरणास प्रारंभ; १ हजार २९१ कोटींची तरतुद
आॅनलाईन लोकमत
खंडाळा , दि. 0२ : खंडाळा तालुक्याला वरदान ठरलेल्या धोम बलकवडी कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. अस्तरीकरणानंतर प्रवाही पाण्याचा वेग वाढणार असला तरी खंडाळा तालुक्याला मात्र यापुढे अधिकृत पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे शेती सिंचनाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामासाठी १ हजार २९१ कोटी रुपयांची चतुर्थ सुधारित मान्यता देण्यात आली आहे.
खंडाळा तालुक्याच्या माथ्यावरील दुष्काळी टिळा कायमस्वरुपी पुसून धोम बलकवडी प्रकल्प तालुक्यासाठी वरदान ठरलेला आहे. या कालव्यामुळे जवळपास अर्ध्या तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेती पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. धरणाच्या निर्मितीपासून या कालव्याद्वारे तालुक्यात पाणी सोडण्यात येत आहे . कालव्यातून पाझर पध्दतीने ठिकठिकाणी पाणी वाहत असल्याने आजपर्यंत ऐन उन्हाळ्यातही माळरानातून पाणी वाहताना दिसत होते . या कालव्याद्वारे भोर तालुक्यातील १ हजार ५० हेक्टर, खंडाळा तालुक्यातील ४ हजार ३०० हेक्टर व फलटण तालुक्यातील १२ हजार ७५० हेक्टर अशी एकूण १८ हजार १०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
धोम बलकवडी धरण व कालव्याची कामे पूर्ण करण्यासाठी ३० मे रोजी नवीन निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जुन २०१८ पर्यंत कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण करण्याचे आदेश जलसंधारण विभागाने दिलेले आहेत. त्यानुसार येत्या वर्षभरात काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कामात वेग घेतला आहे. या कामानंतर खंडाळा तालुक्याला करारानुसार केवळ ०.६४ अघ फूट प्रवाही पाणीच वापरता येणार आहे. त्यामुळे या वषापार्सून शेतकाऱ्यांना पाणी साठवण व शेती सिंचनाचे योग्य नियोजन करावे लागेल.
निरा देवघरी कामे अपूर्ण...
धोम बलकवडी कालव्यासाठी प्रकल्प जलनियोजनातून २ .७० अ .घ . फूट पाणी सोडण्यात येते मात्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार निरा देवघर प्रकल्पातील ०.९३ अ. घ. फूट पाणी धोम बलकवडीच्या कालव्यात अतिरिक्त सोडण्यास मंजूरी दिली आहे . त्यामुळे एकूण ३ .६३ अ .घ . फूट पाणी वापर प्रस्तावित केला आहे . मात्र नीरा देवघरची कामे अपूर्ण ठेवून सुमारे एक टीएमसी पाणी धोम कालव्यात टाकण्याचा निर्णय घेतल्याने खंडाळा तालुक्याचे मोठे नुकसान होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे .
खंडाळा तालुक्याला धोम बलकवडी प्रकल्पाच्या पाण्याबरोबरच नीरा देवघरच्या पाण्याचा अधिक फायदा आहे . नीरा देवघर प्रकल्पाची मंजूरी अगोदरची असताना या कालव्याची कामे अपूर्ण ठेवून पाणी दुसरीकडे वापरायला देणे हे या प्रकल्पाच्या अंतर्गत शेतकऱ्यांवर अन्याय आहे . शासनाच्या या निर्णयाला आमचा विरोध आहे. याही कालव्याची कामे पूर्ण करून हक्काचे पाणी खंडाळा तालुक्याला मिळाले पाहिजे.
- अ?ॅड . बाळासाहेब बागवान,
अध्यक्ष पाणी पंचायत