ऐंशी मेंढ्यांसाठी मिळतात तीनशे रुपये
By admin | Published: June 28, 2015 10:31 PM2015-06-28T22:31:13+5:302015-06-29T00:28:37+5:30
पोटासाठी भटकंती : मुक्या प्राण्यांना जगवताना औषधाचाही खर्च निघेना
शाहूपुरी : गेल्या कित्येक वर्षांपासून मेंढीपालन आणि खत व्यवसाय सुरू आहे. मेंढीखत म्हटले तर शेती नांगरून झाल्यानंतर शेतकरी मेंढपाळास शेतात खत टाकण्याकरिता बोलवतात. खत टाकल्याने उत्तम दर्जाचे पीक येते. मेंढपाळास एकरी रोज तीनशे रुपये मिळतात. चार दिवस मेंढपाळ आपल्या मेंढ्या शेतीमध्ये कुंपण करून खत टाकण्यास बसवतात; पण हा व्यवसाय सध्या अडचणीत आल्याचे मेंढपाळ सांगत आहेत.
मेंढीखत म्हटले की, ज्वारी, गहू, ऊस, आले, हळद पिकांकरिता सर्वात उत्तम दर्जाचे खत, असे म्हटले जाते. शेतकरी नांगरणी झाल्यानंतर लगेच मेंढपाळास शेतामध्ये खत टाकण्याकरिता बोलवतात. मेंढपाळ आपल्या कुटुंबासह मेंढ्या घेऊन खत टाकण्याकरिता एकरी छोटेसे कुंपण टाकून त्यामध्ये पन्नास मेंढ्या चार दिवस बसवतात. त्यांना प्रतिएकरी रोज दोनशे ते तीनशे रुपये व थोडी गहू, ज्वारी शेतकरी त्यांना देतात. शेती नसल्याने नाइलाजाने मेंढीपालन व्यवसाय करावा लागत आहे. अपेक्षेएवढे उत्पन्नही त्यांना मिळत नाही. अनेक मेंढपाळ आपल्या मेंढराचा कळप घेऊन विघ्नहर्ता कॉलनी लगत दाखल झाले आहेत. एका मेंढपाळाचा मुलगा दोन दिवसांपूर्वी आपल्या मेंढ्यांना पाला काढण्यासाठी झाडावर चढला असता तो खाली पडल्याने त्याचा मणका सरकला. येथील डॉक्टरांनी त्याचा पाटीचा मणका सरकल्याने त्याचे शस्त्रक्रिया करण्यास एक लाख तीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, असे त्याच्या वडिलांना सांगताच त्यांना मानसिक धक्काच बसला. अगोदरच मेंढीखत पालन व्यवसाय अडचणीत असताना एवढी मोठी रक्कम आणायची कोठून असा प्रश्न मुलाच्या वडिलांना पडला आहे. (प्रतिनिधी)
आम्हाला शेती नसल्यामुळे आम्ही मेंढीपालन व्यवसाय करतो. सध्या तोही आम्हाला परवडेनासा झाला आहे. आमची रोजीरोटीही त्यावर आता चालत नाही. आम्हाला दररोज एकरी फक्त तीनशे रुपये मिळतात. सातशे रुपये तरी मिळावेत, अशी अपेक्षा आहे.
- साधू मासाळ,
पळसावडे, ता. माण
माझा मुलगा मेंढ्यांना पाला काढण्यासाठी झाडावर चढला होता तोही पाय घसरून पडल्याने त्याचा पाठीचा मणकाही सरकला आहे. डॉक्टरांनी एक लाख तीस हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. एवढी मोठी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
- हणमंत मासाळ,
पळसावडे, माण