मुलाच्या त्रासाला कंटाळून वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न, सतर्क नागरिकांनी वाचविले प्राण; साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 04:00 PM2022-04-19T16:00:38+5:302022-04-19T16:01:03+5:30
सातारा : सकाळी साडेदहाची वेळ. फुटक्या तलावात काही मोजकेच युवक आणि काही नागरिक पोहत होते. त्यावेळी अचानक तलावातील मंदिराच्या ...
सातारा : सकाळी साडेदहाची वेळ. फुटक्या तलावात काही मोजकेच युवक आणि काही नागरिक पोहत होते. त्यावेळी अचानक तलावातील मंदिराच्या पाठीमागून एका वृद्धाने तलावात कपड्यासकट उडी मारली. हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने तलावात उडी मारून वृद्धाचा जीव वाचविला.
काही क्षण जरी उशिरा झाला असता तर वृद्धाला जीवाला मुकावे लागले असते. मुलाच्या त्रासाला कंटाळून आपण हे पाऊल उचलले होते, असे त्या वृद्धाने हताश होऊन जीव वाचविणाऱ्या नागरिकांना सांगितले.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने फुटक्या तलावामध्ये पोहण्यासाठी युवक व नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. पहाटे सहापासून या तलावात पोहण्यासाठी गर्दी होत असते. मात्र, दहानंतर इथली गर्दी ओसरू लागते. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता काही मोजकेच युवक व नागरिक पोहत होते.
त्यावेळी ६३ वर्षीय एक वृद्ध फुटका तलाव गणेश मंदिरात आले. दर्शन घेऊन मंदिराच्या मागील बाजूला गेले. त्यानंतर त्यांनी अचानक कपड्यासकट तलावात उडी मारली. याच तलावाशेजारी अनुजित बोधे यांचे घर आहे. बोधे हे गॅलरीमध्ये उभे असताना त्यांना वृद्धाने तलावात उडी मारल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने घरातून बाहेर येऊन पोहत असलेल्यांना आवाज दिला. मात्र, त्यांना एेकायला आले नाही. त्यामुळे ते धावतच तलावाजवळ आले. तेव्हा प्रसाद भोंडे हे पोहत होते. त्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या वृद्धाला पाण्यातून वर काढले.
तुम्ही कशासाठी हा प्रकार केला, असं त्यांना जेव्हा उपस्थित नागरिकांनी विचारलं, तेव्हा त्यांनी मुलाचा आणि पुतण्याचा त्रास सहन होत नाही. मुलगा हात उगारतो. त्यापेक्षा जीवनच नको म्हणून मी आत्महत्या करत होतो, असं त्यांनी सांगितलं.
लक्ष असू द्या..
फुटका तलाव हा मध्यवस्तीत आहे. त्यामुळे काैटुंबिक कलह झाल्यास अनेकजण या तलावात आत्महत्या करण्यासाठी येतात. यापूर्वीही अनेकांनी या तलावात आत्महत्या केली आहे. असे प्रकार पुन्हा कधीही घडू शकतात. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. शिवाय इथे दिवसा सुरक्षा रक्षकांची नेमणूक व्हावी, अशीही सातारकरांची मागणी आहे.