चार्जिंगचा मोबाइल घेऊन येताना वाहनाची धडक, वृद्धा ठार
By नितीन काळेल | Published: June 7, 2024 06:49 PM2024-06-07T18:49:41+5:302024-06-07T18:50:11+5:30
खावलीतील प्रकार : सातारा-कोरेगाव रस्त्यावर अपघात; वाहन चालक पळाला
सातारा: सातारा-कोरेगाव रस्त्यावर खावली येथे चार्जिंगला लावलेला मोबाइल घेऊन रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने वृद्धेला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेली वृद्धा ठार झाली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी यशवंत गुणाजी अडागळे (रा. खावली, ता. सातारा. मूळ रा. वाहेगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दि. २ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास खावली येथे सातारा-कोरेगाव रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात साखराबाई यशवंत अडागळे (वय ६०) या ठार झाल्या. तर तक्रारदार यांची पत्नी साखराबाई या रस्त्याच्या पलीकडील दुकानात चार्जिंगसाठी लावलेला मोबाइल घेऊन चालत परत येत होत्या. त्यावेळी भरधाव वेगात एक वाहन आले. या वाहनाची धडक साखराबाई यांना बसली. त्यानंतर वाहन कोरेगावच्या दिशेने भरधाव गेले. या अपघातात साखराबाई अडागळे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली हाेती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात हलगर्जी मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस वाहन चालकाचा शोध घेत आहेत.