Satara: आम्ही तुमची 'लाडकी बहीण' नाही का?, वृद्ध महिलांचे कऱ्हाडात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 01:21 PM2024-07-12T13:21:12+5:302024-07-12T13:21:38+5:30
कऱ्हाड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली असली तरी योजनेतील अटीमुळे ६५ वर्षांच्या पुढील ...
कऱ्हाड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली असली तरी योजनेतील अटीमुळे ६५ वर्षांच्या पुढील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. शिवाय एका कुटुंबातील केवळ दोनच महिला या योजनेसाठी पात्र असतील, हा निकषही महिलांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे आम्ही तुमची लाडकी बहीण नाही का? असा सवाल ६५ वर्षांपुढील महिलांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, वयाची अट रद्द करून सरसकट महिलांना या योजनेचा लाभ द्या, अशी मागणी जोर धरत आहे. विविध पक्ष, संघटनांनी यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
राज्य शासनाने दि. १ जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील महिलांची माहिती घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. मात्र योजनेतील जाचक अटीमुळे ६५ वर्षांच्या पुढील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. शिवाय अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. वयाच्या साठीनंतर आजारपण शिवाय कुटुंब विभक्त झाली असल्याने वृद्धाच्या पालनपोषणाचा प्रश्न उपस्थित होतो. सरसकट महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, रयत क्रांती संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर वयोवृद्ध महिलांनी धडक मारली. मोर्चाचे नेतृत्व रयत क्रांती संघटनेचे कराड तालुका अध्यक्ष अशोक लोहार यांनी केले होते. यावेळी आम्हाला योजनेचा लाभ द्या, अशी मागणी ६५ वर्षांपुढील वयोवृद्ध महिलांनी केली आहे.
आरपीआय महिला आघाडीचे निवेदन
दरम्यान, आरपीआय महिला आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष माधुरी टोणपे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी हे निवेदन दिले. ६५ वर्षांवरील महिलांवर सरकारने अन्याय केला आहे. त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. राज्यातील ६५ वर्षांवरील कोणत्याही महिलेला योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सविता काकडे, सुमन शिंदे, मीरा भांगे, जगूबाई काकडे, सोनाबाई गदाळे, विद्या बनसोडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.