जिल्हा बँकेसह सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:40 AM2021-04-07T04:40:44+5:302021-04-07T04:40:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीचा संसर्ग पुन्हा वाढल्याने शासनाने जिल्ह्यासह राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०२१ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना महामारीचा संसर्ग पुन्हा वाढल्याने शासनाने जिल्ह्यासह राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्ह्यातील १०६ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे जाणार आहेत. मात्र, कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने घालून दिलेले नियम पाळून घेण्यात येणार आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने ३१ मार्चपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून मुदत संपलेल्या संचालकांना सातत्याने मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा कोरोना महामारीचा संसर्ग वाढू लागल्याने शासनाला निवडणुका पुढे करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग सर्वत्र पुन्हा वाढला. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे. या परिस्थितीमध्ये जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, सहकारी संस्थांच्या निवडणुकांना एक वर्षापेक्षा अधिक काळ मुदतवाढ देता येत नाही. परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाला असलेल्या नैसर्गिक अंतर्भूत सार्वभौम अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम १५७ मधील तसेच कलम ७३ क मधील तरतुदीनुसार सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.
चौकट
कृष्णा कारखान्याची निवडणूक प्रक्रिया मात्र सामाजिक अंतराच्या अटींचे पालन करून होणार आहे सहकाराच्या निवडणुका गेल्या वर्षापासून स्थगित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.