कराडात शुभेच्छा फलकांवर निवडणुकीचे रंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:39 AM2021-03-18T04:39:03+5:302021-03-18T04:39:03+5:30

कराड : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा बुधवारी वाढदिवस झाला. खरंतर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते कराडमध्ये उपलब्ध नव्हते; ...

Election colors on greeting boards in Karad! | कराडात शुभेच्छा फलकांवर निवडणुकीचे रंग !

कराडात शुभेच्छा फलकांवर निवडणुकीचे रंग !

Next

कराड : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा बुधवारी वाढदिवस झाला. खरंतर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते कराडमध्ये उपलब्ध नव्हते; तरीही शहरभर शुभेच्छा फलक मोठ्या प्रमाणात झळकले आहेत. या फलकांवर येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीचे रंग स्पष्ट दिसत असून, त्याबाबतची राजकीय चर्चा शहरभर सुरू झाली आहे.

सातारा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कराडला राजकीयदृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असणाऱ्या कराड शहरात नगरपालिकेची सत्ता कोणाकडे? याला महत्त्व आहेच. दिवंगत ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी सलग चाळीस वर्षे कराडचे नगराध्यक्षपद भूषविले व एक इतिहासच रचला आहे. आता तसा इतिहास रचण्याचा कोणी विचारही करू शकत नाही हे खरे !

कराड पालिका निवडणुकीत आघाड्यांचे राजकारणच पाहायला मिळते. पक्षीय झेंडे बाजूला ठेवून पालिकेत आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणे अनेकजण पसंद करतात. या राजकारणात आजवर अनेक आघाड्या जन्माला आल्या. त्यातील काहींचे अस्तित्व आज दिसत नाही. काहींचे नाममात्र दिसते तर काही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यात काही नवीन आघाड्या आजही भर घालताना दिसतात. काही महिन्यांवर येऊन ठेपलेली पालिका निवडणूकही आघाड्यांच्या माध्यमातूनच लढविली जाईल, असा कयास काहीजण बांधतात.

पालिकेची गत निवडणूक तत्कालीन सत्ताधारी ‘लोकशाही’ आघाडीविरुद्ध ‘जनशक्ती’ आघाडी अशी झाली. भाजपने मात्र पक्ष चिन्ह वापरून थेट जनतेतून नगराध्यक्षा निवडून आणण्याची किमया केली; पण त्यांना बहुमत मिळवता आले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती आघाडीला बहुमत मिळाले; पण निकालानंतर ‘गड आला; पण सिंह गेला’ अशी जनशक्तीची अवस्था पाहायला मिळाली. त्यामुळे ‘जनशक्ती’त धुसफूस सुरू झाली. आणि काही दिवसांतच जनशक्तीच्या नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाण यांना सोडचिठ्ठी देत सवतासुभा मांडला; तो आजअखेर कायमच आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आघाडी पालिकेत निवडून येऊनही चव्हाणांचे हात रिकामेच राहिले.

आता काही महिन्यांवर निवडणूक येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत उभे राहण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्या सर्वांना मी इच्छुक आहे, हे सांगण्यासाठी काहीतरी निमित्त हवे होते; ते चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळाले. त्या संधीचा त्यांनी फायदा करून घेतला; पण त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

चौकट :

राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, हे खरे आहे. त्यामुळे गत विधानसभेला पृथ्वीराज यांच्या विरोधात प्रचार करणारी मंडळी आज त्यांना शुभेच्छा देणाऱ्या फलकांवर दिसत आहे. तसेच गत पालिका निवडणुकीत लोकशाही आघाडीतून लढलेले काहीजण आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताचे चिन्ह असलेल्या शुभेच्छा फलकावर दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीचे चित्र हे वेगळे असते, याचा प्रत्यय येत आहे.

चौकट:

हाताचे चिन्ह नेमकं सांगतंय काय ?

चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या फलकावर हमखास हाताचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे हाताचं चिन्ह नेमकं सांगतंय काय? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गत पालिका निवडणुकीत झालेली चूक या निवडणुकीत सुधारणार आहेत, असं तर सूचित केले जात नाही ना, यंदाची पालिका निवडणूक पृथ्वीराज चव्हाण पक्षीय चिन्हावर लढण्याचा निर्णय घेणार का? याबाबतच्या चर्चा शहरभर सुरू झालेल्या आहेत.

फोटो :

Web Title: Election colors on greeting boards in Karad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.