अस्तित्वात नसलेल्या गावाची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:37 AM2021-01-03T04:37:57+5:302021-01-03T04:37:57+5:30
सातारा : सातारा तालुक्यातील समर्थनगर हे गाव महसुली दप्तरी अस्तित्वात नसताना या गावच्या निवडणुकीचा घाट निवडणूक आयोग व महसूल ...
सातारा : सातारा तालुक्यातील समर्थनगर हे गाव महसुली दप्तरी अस्तित्वात नसताना या गावच्या निवडणुकीचा घाट निवडणूक आयोग व महसूल प्रशासनाने रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सुनील शिवराम माने यांनी केलेल्या तक्रारीकडेही दुर्लक्ष केल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर येत आहे.
याबाबत दिलेल्या तक्रार अर्जात माने यांनी म्हटले आहे की, कोडोली गावचे विभाजन करुन समर्थनगर या महसुली गावची निर्मिती दि. २७ एप्रिल २००० रोजीच्या शासन राजपत्राच्या आदेशाने केली गेली होती. कोडोलीमधील सर्व्हे नंबर ३०४, ३०५, ३०६, ३०७, ३०८ व ३१० या गटांचा समावेश करुन नवीन समर्थनगर महसुली गावची निर्मिती केली गेली. समर्थनगर महसुली गाव जरी नव्याने निर्माण केले होते; तरी महसुली दप्तराचे विभाजन न झाल्याने या गावचे सर्वच महसुली अभिलेख मूळच्या कोडोली गावच्या नावे निघत होते.
दि. ९ जुलै २००९ च्या राजपत्र आदेशाने कोडोली गावचे पुन्हा विभाजन करण्यात येऊन मौजे संभाजीनगर व विलासपूर ही नवीन मसुली गावे निर्माण केली होती; परंतु ही गावे निर्माण करताना समर्थनगर गावच्या अस्तित्वात आली, त्या सर्व सर्व्हे नंबरचे वाटप संभाजीनगर व कोडोली ग्रामपंचायतीला करण्यात आले. संभाजीनगरमध्ये सर्व्हे नं. ३०४, ३०५ तर उर्वरित सर्व्हे नंबर ३०६, ३०७, ३०८ व ३१० हे गट कोडोलीमध्ये समाविष्ट केले गेले. कोणतेही क्षेत्र शिल्लक नसल्याने समर्थनगर या महसुली गावचे अस्तित्व महसुली दप्तरी ९ जुलै २००९ पासून संपुष्टात आले.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच या जागरुक ग्रामस्थांनी ही निवडणूक दप्तर दुरुस्त झाल्याशिवाय घेऊ नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली. तरीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. प्रभाग रचनेवर या मुद्द्यांवर हरकत घेऊनही प्रशासनाने दाखल हरकतींचे काय झाले, हे कळविण्याचे औदार्यही दाखवले नाही, असेही या तक्रारीत म्हटले आहे.
कोट..
स्थानिक ग्रामस्थांना भौतिक सुविधांपासून आवश्यक त्या दाखल्यांपासून वंचित रहावे लागत असल्याची बाब वारंवार घडू लागली आहे. त्यामुळे काही जागरुक ग्रामस्थांनी याची कारणमीमांसा जाणून घेऊन झालेली घोडचूक महसूल प्रशासनाच्या निदर्शनास दोन वर्षांपूर्वीच आणून दिली होती. मात्र प्रशासनाने टोलवाटोलवी केली.
सुनील शिवराम माने, तक्रारदार
चौकट...
समर्थनगरचा प्रश्न ज्वलंत आणि गंभीर आहे. त्यामुळे प्रशासन समर्थनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत काय भूमिका घेणार याकडे या भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.