‘अजिंक्यतारा’चा बिनविरोधचा डंका!, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे पारडे जड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 02:01 PM2022-06-16T14:01:02+5:302022-06-16T14:01:45+5:30
कारखान्याच्या मागील तीन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे आताही ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
सातारा : शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा बिगुल वाजला असला तरी मागील काही पंचवार्षिक पाहता आताही बिनविरोधचा डंका वाजू शकतो. त्यामुळे बिनविरोधची इतिहास कायम राहणार आहे. त्यातूनही निवडणूक लागल्यास २२ हजारांवर मतदारांच्या हाती २१ संचालकांचा फैसला राहणार असला तरी सत्ताधाऱ्यांचेच पारडे जड आहे.
सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आहे. दिवंगत माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांचे या कारखान्यावर पूर्वीपासून वर्चस्व राहिले, तर आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कारभार पाहत आहेत. या कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा तालुक्यापुरते मर्यादित आहे. कारखान्याची सभासद संख्या २२ हजार ५०० आहे. या कारखान्याच्या मागील तीन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे आताही ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
त्यादृष्टीने हळूहळू पावले पडू लागली आहेत. तसेच या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले जो निर्णय घेतील, त्याला विद्यमान संचालकांचाही पाठिंबा असणार आहे. तरीही निवडणूक झाल्यास विरोधकांना मोठी हार पत्करावी लागू शकते.
१७ जुलै रोजी मतदान
बुधवार, १५ जूनपासूनच नामनिर्देशन पत्र विक्री आणि स्वीकृतीस सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कोणीही अर्ज नेला नाही. त्यामुळे पहिला दिवस कोरा गेला आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमधील पहिल्या मजल्यावर निवडणूक कार्यालय आहे. या ठिकाणी २१ जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. ७ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. १७ जुलै रोजी मतदान होणार आहे.