कराड तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध!, अॅड.उदयसिंह पाटलांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
By प्रमोद सुकरे | Updated: November 3, 2022 17:42 IST2022-11-03T17:28:17+5:302022-11-03T17:42:12+5:30
कऱ्हाड : कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी ...

कराड तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध!, अॅड.उदयसिंह पाटलांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
कऱ्हाड : कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी जेवढ्या जागा तेवढेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून फक्त निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी राहिली आहे. त्यामुळे अॅड.उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर संघाच्या सभासदांनी शिक्कामोर्तब केले असेच म्हणावे लागेल.
माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांनी सन १९७४ साली या संस्थेची सत्ता पहिल्यांदाच आपल्या ताब्यात घेतली होती. त्यानंतर जवळजवळ ९ निवडणुका बिनविरोध पार पडल्या. आता विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनानंतर खरेदी विक्री संघाची ही पहिलीच निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवार दि.२ नोव्हेंबर होती तर गुरुवारी दि.३ नोव्हेंबरला अर्जांची छाननी झाली. त्यामध्ये सर्व अर्ज पात्र झाल्याने बिनविरोध निवडणूकचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक संदिप जाधव काम पहात आहेत.
दिवंगत विलासराव पाटील- उंडाळकर यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे सुपुत्र अॅड. उदयसिंह पाटील काम पाहात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली यावेळी पहिल्यांदाच खरेदी विक्री संघाची निवडणूक लढवली जात असून या निवडणुकीचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाल्याने अँड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास दाखवल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
बिनविरोध उमेदवार पुढीलप्रमाणे- रंगराव थोरात (कार्वे), हणमंतराव चव्हाण (साजुर), उत्तम जगताप (वडगाव हवेली) बाजीराव पाटील( येळगाव), प्रताप कणसे (शेणोली), अनिल मोहिते (तळबीड), श्रीमंत काटकर (बेलदरे) कैलास साळवे (मुंढे), यशवंत डुबल (हजारमाची), जगन्नाथ मोरे (कापील), मच्छिंद्र बानुगडे( बानुगडेवाडी ),जगन्नाथ थोरात (कोर्टी), रंजना पाटील (कोळे), शालन जाधव (टाळगाव) दिलीप भिसे (सुर्ली), महेश पाटणकर (कासारशिरंबे), किसन चव्हाण (नवीन कवठे)