जनता बॅंकेच्या १७ जागांसाठी १७ जूनला धुमशान; १९ जण निवडणूक रिंगणात
By नितीन काळेल | Published: June 2, 2023 07:14 PM2023-06-02T19:14:31+5:302023-06-02T19:14:42+5:30
सातारा शहरवासीयांची अऱ्थवाहिनी असणाऱ्या जनता सहकारी बॅंक निवडणुकीत शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या.
सातारा : सातारा शहरवासीयांची अऱ्थवाहिनी असणाऱ्या जनता सहकारी बॅंक निवडणुकीत शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या. त्यातून आणखी तीन जागा बिनविरोध झाल्या. तर आता सर्वसाधारणमधील १६ आणि ओबीसी प्रवर्गातील एका अशा एेकूण १७ जागांसाठी निवडणूक होणार असून १९ जण रिंगणात आहे. तर एकूण चारजण बिनविरोध निवडले आहेत. सोमवारी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
जनता सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीत सर्वसाधारणमधून १६ जणांना निवडून द्यायचे आहे. महिला प्रवर्ग २, अनुसूचित जाती-जमाती गटातून १, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास गट १ आणि ओबीसी गटातूनही एका संचालकाला निवडून द्यायचे आहे. यामधील विशेष मागास गटात एकच अर्ज राहिला होता. त्यामुळे बाळासाहेब गोसावी यांची बिनविराेध निवड झाली आहे. तर मागील १२ दिवस उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया सुरू होती. शुक्रवार माघारचा अंतिम दिवस होता. त्यामुळे अनेक घडामोडी घडून आल्या. काहींनी माघार घेतली. त्यामुळे महिलांमधील दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये सुजाता राजेमहाडिक आणि चेतना माजगावकर यांचा समावेश आहे. तर अनुसूचित जाती-जमाती गटातूनही प्रकाश बडेकर यांनी माघार घेतल्याने विजय बडेकर यांची बिनविराेध निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्वसाधारणमधील १६ जागा आहेत. यासाठी १७ जणांत लढत आहे. आनंदराव कणसे, विनोद कुलकर्णी, अक्षय गवळी, चंद्रशेखर घोडके, जयेंद्र चव्हाण, मच्छिंद्र जगदाळे, वजीर नदाफ, शकील बागवान, अविनाश बाचल, चंद्रकांत बेबले, जयवंत भोसले, रवींद्र माने, अमोल मोहिते, वसंत लेवे, नारायण लोहार, रामचंद्र साठे आणि माधव सारडा हे रिंगणात आहेत. ओबीसी प्रवर्गात चारुदत्त सपकाळ आणि अशोक माेने यांच्यातच लढत होणार आहे. बॅंकेच्या १७ जागांसाठी निवडणूक रिंगणात १९ जण राहिले आहेत. तर १७ जूनला मतदान होऊन १८ रोजी निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा पंडितराव यांनी दिली.
‘भागधारक’च सत्ताधारी...
जनता बॅंकेवर भागधारक पॅनेलची सत्ता आहे. तर या निवडणुकीत आतापर्यंत भागधारक पॅनलचेच चाैघे उमेदवार बिनविरोध निवडूण आलेले आहेत. तर हा पॅनेल सर्व जागा लढवत आहे. आता १७ जागांसाठी मतदान होणार असलेतरी सत्ता ही भागधारक पॅनलचीच राहणार आहे.