फलटण पालिकेच्या सभापती निवडी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 03:57 PM2021-01-05T15:57:10+5:302021-01-05T15:59:06+5:30
phaltan Muncipal Corporation Satara- फलटण नगरपरिषदेच्या विविध विषय समिती व त्यांच्या सभापती निवडी मंगळवारी बिनविरोध पार पडल्या. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करण्यात आला.
फलटण : फलटण नगरपरिषदेच्या विविध विषय समिती व त्यांच्या सभापती निवडी मंगळवारी बिनविरोध पार पडल्या. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करण्यात आला.
फलटण नगरपालिकेच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहात विविध विषय समित्यांच्या निवडीसाठी मंगळवारी नगरसेवकांची बैठक बोलविण्यात आली होती. या निवडी निवडणूक पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या उपस्थितीत पार पडल्या.
यामध्ये स्थायी समितीच्या पदसिध्द अध्यक्षपदी नगराध्यक्षा नीता नेवसे, नियोजन व विकास समितीच्या सभापतिपदी नंदकुमार भोईटे यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर यांची सार्वजनिक बाधकाम समितीच्या सभापतिपदी, मधुबाला भोसले यांची पाणी पुरवठा व जलनि:सारण समिती सभापतिपदी, सनी अहिवळे यांची स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदी, किशोरसिंह नाईक-निंबाळकर यांची शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतिपदी, रंजना कुंभार व दीपाली निंबाळकर यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी व उपसभापतिपदी निवडी जाहीर झाल्या आहेत. स्थायी समितीच्या सदस्यपदी रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, पांडुरंग गुंजवटे, अशोकराव जाधव यांची निवड झाली.
सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी अभिनंदन केले. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याहस्ते करण्यात आला.