मतदानादिवशीच जाहीर होणार निकाल !
By admin | Published: March 6, 2015 11:42 PM2015-03-06T23:42:24+5:302015-03-06T23:43:48+5:30
महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल : जिल्हा प्रशासन पन्नास ग्रामपंचायतींमध्ये राबविणार प्रयोग
सागर गुजर / सातारा
जिल्ह्यातील ८९३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०१५ अखेर होणार आहेत. यापैकी ५० ग्रामपंचायतींमध्ये मतदानानंतर लगेचच स्थानिक पातळीवरच मतमोजणी करण्याचा वेगळा प्रयोग जिल्हा प्रशासन करणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यभर तो रोल मॉडेल म्हणून राबविण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मुंबई येथे बैठक आयोजित केली होती. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे हे या बैठकीला उपस्थित होते. मुंबई येथे झालेल्या या बैठकीत सहारिया यांनी सातारा व पुणे जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका या राज्यासाठी रोल मॉडेल ठरतील, असे नियोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. याच बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन राबविणार असणाऱ्या प्रयोगांचे प्रेझेंटेशन देण्यात आले.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल तालुक्याच्या ठिकाणी जाहीर करण्याची पद्धत आहे. ग्रामपंचायत निवडणूक अधिनियमात निवडणुका कशा पद्धतीने घ्याव्यात, याचे सविस्तर विश्लेषण नसले तरी निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी होणाऱ्या सूचनांनुसार निवडणुकांमध्ये प्रयोग केले जातात. आदल्या दिवशी मतदान व दुसऱ्या दिवशी मतमोजणी अशी पारंपरिक पद्धत आहे. त्यात नव्याने बदल करता येऊ शकतो का? याची चाचपणी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण ८९३ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या डिसेंबरअखेर होणार आहे.
यापैकी ७०२ ग्रामपंचायतींची निवडणूक एकाच दिवशी घेण्यात येणार असून, त्यामधील ५० ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाल्यानंतर लगेच मतमोजणी घेऊन निकाल जाहीर करण्याचा प्रयोग जिल्हा प्रशासन राबविणार आहे. यासाठी निवडणूक काळात ज्या गावांमधील वातावरण पोषक असेल तिथे हा प्रयोग राबविता येईल. दरम्यान, कोणत्या गावांचा यात समावेश असणारा याची चाचपणी येत्या काही काळात केली जाणार आहे. निवडणुकीसाठी मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम तालुक्यांच्या पातळीवर सुरू आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झोनल आॅफिसर नेमण्यात येणार आहेत. निवडणूक निरीक्षक म्हणून महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशा विविध उपाययोजनाही जिल्हा प्रशासन राबविणार आहे.