किडगावच्या सरपंचपदी शुभांगी चोरगे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:40 AM2021-02-11T04:40:03+5:302021-02-11T04:40:03+5:30
किडगाव : सातारा तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नेले किडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शुभांगी चोरगे, तर उपसरपंचपदी इंद्रजित ढेंबरे यांची ...
किडगाव : सातारा तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नेले किडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शुभांगी चोरगे, तर उपसरपंचपदी इंद्रजित ढेंबरे यांची बिनविरोध निवड झाली.
ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच अटी-तटीची झाली होती. या निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने गणेश विकास परिवर्तन पॅनलचा नऊ विरुद्ध शून्य असा दारुण पराभव केला. भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले व सातारा दूध पुरवठा संघाचे संचालक इंद्रजित ढेंबरे यांनी केले.
आरक्षण सोडतीमध्ये महिला सर्वसाधारणपदासाठी सरपंचपद आरक्षित झाल्याने सरपंचपदाच्या खुर्चीवर शुभांगी चोरगे यांना बसण्याचा मान मिळाला. खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
यावेळी राजेंद्र शेडगे, नरहरी इंगवले, दिनकर इंगवले, संतोष इंगवले, संतोष टिळेकर, शंकर टिळेकर, सचिन इंगवले, आदम पठाण, विठ्ठल इंगवले, नंदकुमार इंगवले, संतोष शिंदे, विश्वास शिंदे, किरण पवार, संजय इंगवले व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : १० किडगाव
नेले किडगाव ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच शुभांगी चोरगे व उपसरपंच इंद्रजित ढेंबरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. (छाया : गुलाब पठाण)