निवडणूक चिन्हांमध्ये आता माऊस, पेनड्राईव्ह, मोबाईल चार्जरसह १९० चिन्हांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:37 AM2021-01-03T04:37:55+5:302021-01-03T04:37:55+5:30
सातारा : जिल्ह्यातील ८७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली असून, या ग्रामपंचायतींसाठी ७,२६४ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी नामनिर्देशनपत्र ...
सातारा : जिल्ह्यातील ८७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली असून, या ग्रामपंचायतींसाठी ७,२६४ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना ४ जानेवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात होणार आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांसमोर १९० चिन्हांचा पर्याय दिला आहे. १९० चिन्हांमधून उमेदवाराला एका चिन्हाची निवड करता येणार आहे.
जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. नामांकन भरण्याच्या दिवसापासून निवडणुका असलेल्या गावागावांत राजकीय हालचालींना चांगलीच गती आल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार तहसील कार्यालयात येऊन अधिकारी वर्गाकडून अटी व नियमांची माहिती करून घेत आहेत. त्याचबरोबर तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे चिन्हांबाबत माहिती विचारत आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयातर्फे दर्शनी भागात निवडणूक चिन्हांची यादी लावली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्या दिवशीच म्हणजे ४ जानेवारीला ही यादी लावली जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यंदा नव्याने आधुनिक चिन्हांचा समावेश निवडणूक आयोगाने केला आहे. या चिन्हांना उमेदवार पसंती देण्याची शक्यता लक्षात घेऊन तालुकास्तरावर प्रशासनाला योग्य सूचना केल्या आहेत.
- कीर्ती नलावडे, निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामपंचायत
वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणार
निवडणूक अर्ज मागे घेण्यादिवशीच निवडणूक चिन्हे वाटप केली जाणार आहेत. एका पॅनेलला एक चिन्ह मागण्याचा प्रयत्न होणार आहे. मात्र, उमेदवारी अर्ज स्वतंत्रपणे भरले गेले असल्याने जितके उमेदवार तितकी चिन्हे असे चित्र पाहायला मिळणार आहे.