कऱ्हाड तालुक्यातील 'गोंदी'त गुण्यागोविंदाने नांदतेय राजकारण!, सरपंचपद खुले असूनही निवड केली बिनविरोध

By प्रमोद सुकरे | Published: December 10, 2022 07:02 PM2022-12-10T19:02:44+5:302022-12-10T19:11:28+5:30

वीस वर्षांपूर्वी झाली होती बिनविरोध निवडणूक 

Election to the post of Sarpanch in Gondi Gram Panchayat of Karad taluka is uncontested | कऱ्हाड तालुक्यातील 'गोंदी'त गुण्यागोविंदाने नांदतेय राजकारण!, सरपंचपद खुले असूनही निवड केली बिनविरोध

कऱ्हाड तालुक्यातील 'गोंदी'त गुण्यागोविंदाने नांदतेय राजकारण!, सरपंचपद खुले असूनही निवड केली बिनविरोध

Next

प्रमोद सुकरे

कऱ्हाड : थेट सरपंच निवडणुकीमुळे यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत भलतीच रंगत आली आहे. ज्या गावात सरपंच पद खुले आहे तेथे तर अटितटीची लढत पाहायला मिळतेय. या साऱ्याला छेद देत कऱ्हाड तालुक्यातील गोंदी गावात मात्र राजकारण गुण्यागोविंदाने नांदताना पाहायला मिळाले. सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असतानाही २० वर्षानंतर पुन्हा एकदा या गावची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यांचे कौतुक तर सगळीकडे होणारच!

कराड तालुक्यातील गोंदी ची  बागायतदारांचे गाव म्हणून ओळख आहे. त्यामुळे येथे आर्थिक सुबत्ता चांगलीच आहे. तसेच राजकीय दृष्ट्याही हे गाव तितकेच संवेदनशील आहे. म्हणून तर या गावातील लोकांनी आजवर पंचायत समिती, कृष्णा सहकारी साखर कारखाना, कृष्णा सहकारी बँक, कृष्णा कृषी उद्योग संघ,कराड तालुका खरेदी विक्री संघ, कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी प्रतिनिधित्व केले आहे तर आजही काहीजण करीत आहेत.

सुमारे अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेले गोंदी हे गाव आहे. ऊसाच्या शेतीमुळे येथे आर्थिक समृद्धी चांगलीच आहे. त्याचबरोबर राजकारणही तेवढेच समृद्ध असल्याची प्रचिती बिनविरोध निवडणुकीमुळे आली आहे. भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले,काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण,अँड. उदयसिंह पाटील - उंडाळकर,राष्ट्रवादीचे नेते, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते या सगळ्यांचे समर्थक या गावात आहेत.

त्यातच सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी पडल्याने या गावची निवडणूकही अटितटीची होईल अशी चर्चा होती. मात्र ऊसाबरोबर इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेणाऱ्या या गावात यावेळी इंद्रायणीचाच सुवास पसरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधचा डंका पाहिला मिळाला. खरंतर ही बाब इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी, आणि अनुकरणीय आहे.

वीस वर्षांपूर्वी झाली होती बिनविरोध निवडणूक 

गोंदी गावची निवडणूक २० वर्षांपूर्वी अशीच एकदा बिनविरोध झाली होती. त्यावेळी दिवंगत तानाजी पवार हे बिनविरोध सरपंच झाले होते. त्यावेळी देखील गोंदी ची निवडणूक बिनविरोध कशी काय झाली? याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. पण पुन्हा एकदा ग्रामस्थांनी एकजूट दाखवून बिनविरोध ग्रामपंचायत करण्याचा नवा इतिहास रचला आहे.

असे आहेत नवे शिलेदार
सरपंच- सुबराव पवार
सदस्य- शरद पवार ,वैशाली यादव, वनिता पवार, रमेश पवार, अरुणा माने, अजित कुंभार ,रमेश पवार, जयाताई मदने, प्रज्ञा बनसोडे

ग्रामस्थांनी मोठ्या विश्वासाने आम्हाला बिनविरोध निवडून दिले आहे .याची आम्हाला जाणीव आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांना बरोबर घेऊन आदर्श कारभार करण्याचा आमचा प्रयत्न राहील. - सुबराव पवार, सरपंच गोंदी

Web Title: Election to the post of Sarpanch in Gondi Gram Panchayat of Karad taluka is uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.