निवडणुकीची सूत्रे तरुणांच्या हातात...

By admin | Published: November 2, 2016 12:09 AM2016-11-02T00:09:11+5:302016-11-02T00:09:11+5:30

नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच : काँग्रेसचा बालेकिल्ला मोडण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना; गड राखण्यासाठी हालचाली वाढल्या

Elections in the hands of youth ... | निवडणुकीची सूत्रे तरुणांच्या हातात...

निवडणुकीची सूत्रे तरुणांच्या हातात...

Next

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या रणमैदानात मातब्बरांनी दंड थोपाटले असले तरी नगराध्यक्षपदासाठी आरक्षित असलेल्या प्रभागांमधून सर्वसमावेशक उमेदवार देण्यासाठी प्रमुख पक्षांच्या वर्तुळात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी निवडून येण्याची क्षमता याच निकषाचा विचार सुरू आहे. सत्तेचा गड राखण्याबरोबरच सिंह डरकला पाहिजे. यासाठी नगराध्यक्षपदावर निशाणा साधला जात आहे. मात्र, आजच्या छाननीमध्ये कोणाची दांडी गुल होणार यावर पुढील धोरणे अवलंबून असल्याने सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
खंडाळा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा-शिवसेना यांनी नगराध्यक्षपद राखीव असलेल्या प्रभाग क्र. ३, ८, १२, १६ आणि १७ या पाच प्रभागांवर लक्ष केंद्रित केले आहे. या प्रभागांमधून एकूण २६ अर्ज दाखल झाले असले तरी तीन पॅनेलमधून केवळ १५ जणच लढत देण्याची शक्यता आहे. त्यामुळे १७ प्रभागांमधून पक्षीय पातळीवर लढत होण्याबरोबरच नगराध्यक्षपदाच्या प्रभागावर लक्ष वेधले जाणार आहे. त्यासाठी पक्षांच्या वतीने विशेष रचना केली जात आहे.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात हात घालण्यासाठी राष्ट्रवादीने जोमाने तयारी केली असून, प्रत्यक प्रभागवार पक्षनेतृत्वाने प्रचाराची धुरा प्रमुखांवर सोपावली आहे. तर काँग्रेसने आपला मूळचा बांधा मजबूत करण्यावर भर दिला आहे.
खंडाळ्याची निवडणूक ही तरुण फळीच्या हातात असल्याने सर्वच पक्षांनी पक्षातील दुसऱ्या पलटणीवर जबाबदारी सोपावली आहे. काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश गाढवे, किरण खंडागळे, प्रल्हाद खंडागळे, योगेश गाढवे, संतोष बावकर, सचिन खंडागळे, स्वप्निल खंडागळे, युवराज गाढवे, जोतिबा जाधव अशी तरुणांची मजबूत फळी प्रचाराच्या आखाड्यात उतरणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वतीने अ‍ॅड. शामराव गाढवे यांच्या नेतृत्वाखाली शैलेश गाढवे, प्रशांत गाढवे, अशोक गाढवे, दयानंद खंडागळे, केतन देशमुख, सागर गुरव, धैर्यशील नरुटे या तरुण फळीने जोरदार प्रतिउत्तर देण्यासाठी कंबर कसली आहे.
भाजपा-शिवसेनेच्या युतीचा फॉर्म्युला अंतिम झाल्यानंतरच प्रचाराची रणनीती ठरणार असल्याने दोन्ही पक्षांमध्ये सध्यातरी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चीच भूमिका आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरून आदेश येतील त्याचप्रमाणे घडेल असेच बोलले जात आहे. मात्र, या दोन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर सूत जुळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
नगरपंचायतीच्या सभागृहात आपली वर्णी लागावी यासाठी पक्षाचे अधिकृत तिकीट आपल्याच पदरात पडावे, यासाठी इच्छुकांनी आपले पदर पक्षप्रमुखांकडे पसरले आहेत. यामुळे मंगळवारी छाननीमध्ये पक्षाच्या तिकिटाचे दान कोणाच्या पदरात पडणार यावरच लढतीचे चित्र अवलंबून आहे. तिकीट कोणाचे याची अंतिम यादी काँग्रेस-राष्ट्रवादीने तयार केल्याची चर्चा असली तरी उमेदवारांना याची खबर अद्याप नसल्याने आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Elections in the hands of youth ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.