मुंबईतील निवडणुकीआधी सरकार अल्पमतात!
By admin | Published: February 21, 2016 12:51 AM2016-02-21T00:51:08+5:302016-02-21T01:00:17+5:30
पृथ्वीराज चव्हाण : साताऱ्यात वर्तविले भाकित; भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वकांक्षा
सातारा : ‘मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात आल्याखेरीज राज्यावर पकड मिळणार नाही, ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वकांक्षा आहे. त्यामुळे या निवडणुकीआधी सरकार अल्पमतात जाईल,’ असे भाकित माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केले.
आ. चव्हाण म्हणाले, ‘निवडणूक काळात अव्वा-सव्वा आश्वासने देऊन सत्तेवर आलेले भाजप, शिवसेना व मित्र पक्षांचे सरकार अत्यंत तकलादू स्वरूपाचे आहे. या सरकारमध्ये कुणाचा कुणाला पाय-पोस राहिलेला नाही. मुख्यमंत्रीच अधिकारी व सहकारी मंत्री ऐकत नसल्याचे कबूल करतायत. वेळोवेळी तोंडघशी पडण्याची वेळ त्यांच्यावर येत असते. अत्यंत हास्यास्पद पद्धतीने राज्याचे कामकाज सद्यघडीला सुरू आहे. त्यातच भाजपचे वरिष्ठ नेतेमंडळी मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळविण्याची महत्त्वकांक्षा बाळगून आहेत. यामुळे शिवसेना-भाजप या दोन पक्षांमध्ये अल्पावधीत तेढ निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी हे सरकार अल्पमतात जाईल.‘
‘राज्यात भयंकर दुष्काळ पडला असताना सरकार उपाययोजना करण्याऐवजी महंमद तुघलकी निर्णय घेताना पाहायला मिळत आहे. दुष्काळाचे गांभीर्य सरकारला राहिलेले नाही. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळी भागात जनावरांच्या छावण्या बंद करण्याची घोषणा केली, मुख्यमंत्र्यांनाही या घोषणेबाबत कल्पना नव्हती. राज्यभरातून टीका होऊ लागल्यानंतर खडसेंना यू-टर्न घ्यावा लागला,’ अशी टीकाही आ. चव्हाण यांनी केली.
लातूर शहरातही सध्या २५ दिवसांतून एकदा पाणी येते. रेल्वेने पाणी आणून लोकांची तहान भागवू, अशी घोषणा शासनाने केली होती. ती हवेत विरली आहे. शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधील ६० ते ७० हजार जागा रिकाम्या राहिल्या आहेत. या महाविद्यालयांतून तयार होणाऱ्या अभियंत्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याने त्यांना कामावर घेतल्यावर सहा महिन्यांचे पुन्हा ट्रेनिंग द्यावे लागते, असा आरोप उद्योजक करत आहेत.
केंद्र सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी करत आहे. अफजल गुरुला फाशी दिली तर भाजपचा काश्मीरमधील मित्रपक्ष त्याला हुतात्मा म्हणतो तर मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी देशद्रोहासारखे खोटे खटले दाखल केले जातात, असा दांभिकपणा सरकारकडून सुरू आहे.
साताऱ्यातील या पत्रकार परिषदेला काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील, सातारा पालिकेचे आरोग्य सभापती रवींद्र झुटिंग यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)