सहकारी संस्थांच्या निवडणुका 'कमळ' चिन्हावर लढणार नाही, भाजप नेते अतुल भोसलेंनी केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 11:28 AM2022-07-22T11:28:54+5:302022-07-22T11:47:13+5:30
सहकारी संस्थांचा विषय वेगळा असतो त्यामुळे कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही जिल्हा बँकेप्रमाणे आघाडी करूनच लढणार
कऱ्हाड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढाव्यात अशा भाजपच्या सूचना आहेत. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका या भाजप कमळाच्या चिन्हावरच लढेल. पण, सहकारी संस्थांचा विषय वेगळा असतो त्यामुळे कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही जिल्हा बँकेप्रमाणे आघाडी करूनच लढणार असल्याचे मत भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
डॉ. भोसले म्हणाले, ‘कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीत सर्व उमेदवार पक्षाच्या चिन्हावर उभे करणार आहोत. यात चांगले यश मिळेलच, पण आघाडी करण्याची वेळ आली तर ती निकालानंतर कोणाशी करायची हे ठरवावे लागेल. त्याबाबत आता सांगता येत नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका आम्ही पक्षाच्या माध्यमातूनच लढणार आहोत. या निवडणुकीची तयारी आमची कायमच सुरू असते.’
फडणवीस यांना विचारूनच निर्णय
जिल्हा बँकेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय हे आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारूनच घेतला होता. त्यांच्यासमोर दोन्ही बाजू मांडल्या होत्या व त्यांच्याशी विचारविनिमय करूनच तो पाठिंबा दिला होता, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.
कराड नगरपालिकेतील अनेक माजी नगरसेवक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या संपर्कात आहेत. तसे घडल्यास कराड पालिकेची निवडणूक लढताना त्यांना बरोबर घेणार काय? याबाबत छेडले असता पक्ष ज्या सूचना करील त्यानुसार त्या-त्या वेळचे निर्णय होतील, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.