सातारा जिल्ह्यातील आठ सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
By दीपक शिंदे | Published: July 1, 2023 05:16 PM2023-07-01T17:16:29+5:302023-07-01T17:16:57+5:30
सातारा : राज्यात ३० जूननंतर पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सहकारी ...
सातारा : राज्यात ३० जूननंतर पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील आठ सहकारी संस्थांचा समावेश आहे.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन व वाहतूक व्यवस्था कोलमडल्यामुळे कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका सध्या ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दि. ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकललेल्या आहेत.
यामध्ये लोणी विविध कार्यकारी सेवा सोसायटी, ता. खटाव, यशवंतराव माेहिते नागरी सहकारी पतसंस्था, रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड, कराड कंझ्युमर्स को-ऑप. होलसेल अँड रिटेल स्टोअर्स, लि. कराड, कराड नगर परिषद सेवकांची आ. पी. डी. पाटील साहेब सहकारी पतसंस्था, ता. कराड, अजिंक्य माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था, सातारा, सातारा जिल्हा कृषी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्था, महालक्ष्मी बझार सहकारी हाेलसेल कंझ्युमर्स साेसायटी गेंडामाळ, सातारा यांचा समावेश आहे.
२५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था, सर्वोच्च वा उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केलेल्या संस्था व निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या, पण अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड होणे बाकी आहे अशा संस्था वगळल्या आहेत.