Satara: कऱ्हाड तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार!, हरकती सूचनांची मुदत संपली
By प्रमोद सुकरे | Published: February 17, 2024 05:47 PM2024-02-17T17:47:36+5:302024-02-17T17:48:58+5:30
२३ फेब्रुवारीला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार
कऱ्हाड : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच कऱ्हाड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या आणि प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील १६, तर कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार आहे.
कऱ्हाड तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेने बाबरमाची, जुजारवाड़ी, कालेटेक, कोळेवाडी, कोरीवळे, मुनावळे, नडशी, शिंगणवाडी, तुळसण, वनवासमाची (सदाशिवगड), विठोबाचीवाडी, पाचुपतेवाडी, नारायणवाडी, मसूर, राजमाची, पवारवाडी (नांदगाव), वडोली भिकेश्वर, वाण्याचीवाडी, धनकवडी, कचरेवाडी, माळवाडी, यादववाडी, संजयनगर (काले), मेरवेवाडी, कोर्टी, लोहारवाडी, कापील, डिचोली या ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
२८ ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीसाठी ९ फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करून आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे.
सध्या राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे कऱ्हाड तालुक्यातील वातावरणही चांगलेच तापले आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी करत असतानाच उद्या विधानसभेचा वेध घेण्यासाठी राजकीय नेते कामाला लागले असून स्थानिक नेत्यांनाही भाव आल्याचे दिसत आहे.
ऐन उन्हाळ्यात वातावरण आणखी तापणार
आरक्षण निश्चितीबाबत हरकती आणि सूचना दाखल करण्यास १३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती आता संपली आहे. आता २३ फेब्रुवारी रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यामुळे या २८ गावांमध्ये सध्या निवडणूकपूर्व वातावरण सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या निवडणुकांमुळे उन्हाळ्यात ग्रामीण भागातील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे हे निश्चित.