इलेक्टोरल बाँड हा सुनियोजित भ्रष्टाचार, जयंत पाटलांचा भाजपावर घणाघात
By दीपक शिंदे | Published: April 23, 2024 10:11 PM2024-04-23T22:11:09+5:302024-04-23T22:11:27+5:30
'भाजपकडे दहा हजार कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड आले आहेत.'
सातारा : ज्या मोठमोठ्या कंपन्यांची औषधांना मजुरी नाकारली गेली, त्याच औषध कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचे बाँड भाजपने स्वीकारले आहेत. ईडीची कारवाईमुळे तुरुंगवारी टाळण्यासाठी, जे तुरुंगात आहेत त्यांना बाहेर येण्यासाठी आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा तुरुंगात जावे लागू नये, यासाठी अनेकांनी इलेक्टोरल बाँड दिले आहेत. भाजपकडे दहा हजार कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड आले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार सुनियोजित पद्धतीने कसा करायचा, याचा आदर्श भाजपने निर्माण केला असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
लिंब येथील सभेत ते बोलत हाेते. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे भाई जगताप, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने, सारंग पाटील आदी उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, हे सरकार टिकले नाही तर आपले काही खरे नाही, अशी भीती भाजपाला होती. त्यामुळेच भीती दाखवून नेत्यांना पक्ष सोडण्यास परिस्थिती निर्माण करायची आणि पक्ष फोडायचे हा उद्योग केला. यातून मराठी माणसाने स्थापन केलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष फोडले आहेत. परंतु, जे पक्ष सोडून गेलेत, त्यांना आता करमेना झाले आहे. ती मंडळी पुन्हा माघारी फिरू लागली आहेत.
लोकांच्या संसारातून केंद्र आणि राज्य सरकार किती कर गोळा करते आणि त्यांच्या संसारात किती भर घालते. सर्वसामान्यांकडून जीवनावश्यक वस्तूंवर १८ टक्के जीएसटी वसूल केला जातो. मौल्यवान हिरा खरेदी करणाऱ्यांना तीन टक्के जीएसटी आहे.