निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांचे राजकारण!

By admin | Published: November 30, 2015 10:57 PM2015-11-30T22:57:17+5:302015-12-01T00:11:35+5:30

विरोधी नगरसेवक आक्रमक : सर्व विषय एकमताने मंजूर; सत्ताधाऱ्यांच्या विविध विषयांवर अधिकारी धारेवर--कऱ्हाड पालिका विशेष सभा

Electoral politics in the face of elections! | निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांचे राजकारण!

निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांचे राजकारण!

Next

कऱ्हाड : कऱ्हाड शहरातील रस्त्यांच्या पॅचिंगचे काम करण्याचा विषय सत्ताधाऱ्यांना आताच कसा काय सुचला, आम्ही गेल्या चार वर्षांपासून सभागृहात विषय मांडूनही तो मंजुरीसाठी का केला गेला नाही, नगरपालिका निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी पक्षाकडून आता राजकारण केले जात आहे, अशी टीका विरोधी आघाडीतील नगरसेवकांनी केली. तर शहरातील प्रलंबित कामांवरून दोन्ही आघाड्यांतील नगरसेवकांनी प्रशानास धारेवर धरले. शहरातील रस्त्यांचे पॅचिंग, २०१६-१७ मधील हाती घ्यावयाची कामे, अग्निशमन विभागासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या साहित्यांबाबत मंजुरी तसेच शहरातील रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यात येणाऱ्या कामांच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी आदी विषयांबाबत कऱ्हाड पालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आली.सोमवारी कऱ्हाड पालिकेची विशेष सभा पालिका सभागृहात पार पडली. नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे अध्यक्षस्थानी होत्या. मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांची उपस्थिती होती. शहरातील रस्त्याचे पॅचिंग करण्यास प्रशासनाकडून दिरंगाई उपस्थित केली जात आहे. पालिकेकडे आता रस्ते दुरुस्तीसाठी डांबर आहे. मात्र, काम करण्यासाठी यंत्रणा नाही. त्यामुळे आज रस्त्यांच्या पॅचिंगचे काम थांबले आहे. आता तर पालिकेने रस्ते पॅचिंगच्या कामाबाबत ३५ लाखांची निविदा काढली आहे. कामांची रक्कम जास्त असल्याने या कामाबाबत प्रस्ताव येणे अशक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने निविदावरील कामांची किंमत कमी करणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तत्काळ लक्ष द्यावे, अशी लोकशाही आघाडीच्या अध्यक्षांनी नगराध्यक्षांकडे मागणी केली.
जेव्हा विरोधकांकडून सभेदरम्यान ऐनवेळचा विषय मांडला गेला की, लगेच याबाबत सत्ताधारी आघाडातील नगरसेवकांकडून आक्षेप घेतला जात असे. त्यावेळी कडक नियम लावले जात असे. मात्र, आता हे नियम गेले कुठे ? असा सवाल विरोधी पक्षातील नगरसेवक विनायक पावसकर यांनी केला. शहरातील मागील वर्षातील विकासकामे प्रलंबित असून, ती लवकर होणे अपेक्षित आहे. प्रलंबित विकासकामांबरोबर शहरातील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. गुरुवार व रविवारी शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तत्काळ वाहनांच्या पार्किंगबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी सभेदरम्यान नगरसेवक विनायक पावसकर यांनी केली.यावेळी पालिकेकडून घेण्यात आलेल्या विशेष सभेवेळच्या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)

वीस मिनिटांची विशेष सभा
सोमवारी पालिकेच्या सभागृहात पाच विषयांबाबत निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यासभेदरम्यान सत्ताधारी व विरोधकांमधील वादावादी तसेच पाच विषयांना मंजुरी हा प्रकार वीस मिनिटांतच घडला. वीस मिनिटांत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. तर प्रशासनावरही ताशेरे ओढले गेले.

Web Title: Electoral politics in the face of elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.