पुणे-कोल्हापूर पुणे डेमूला जोडले विद्युत इंजिन, अखेर रेल्वे प्रशासनाला जाग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 02:03 PM2024-08-26T14:03:03+5:302024-08-26T14:03:20+5:30
प्रवाशांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
कोरेगाव : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रवाशांची सर्वाधिक पसंती असलेल्या पुणे-कोल्हापूर-पुणे या फास्ट डेमूला अखेर विजेचे इंजिन जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सातत्याने ही डेमू प्रवासादरम्यान जागोजागी बंद पडत होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अखेर प्रशासनाने विजेचे इंजिन जोडून ही डेमू चालविण्यास सुरुवात केली आहे. साताऱ्यातून रविवारी दुपारी पावणेतीन वाजता ही डेमू विजेचे इंजिन जोडून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली.
कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर मार्गावर मध्य रेल्वेकडून डेमू चालविल्या जातात. त्यांपैकी निळा आणि गुलाबी रंग असलेली डेमू सातत्याने बंद पडण्याच्या तक्रारी वाढत होत्या. गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा ही डेमू प्रवासादरम्यान बंद पडली होती. मात्र तत्काळ दुरुस्ती होत नसल्याने प्रवाशांना एका जागी दोन-दोन तास ताटकळावे लागत होते. परिणामी पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेच्या सेवेवरही विपरीत परिणाम होत होता.
लोकप्रतिनिधींसह रेल्वेच्या सल्लागार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी याविषयी मध्य रेल्वेच्या प्रशासनाला वारंवार विनंती केली होती; तसेच वेळप्रसंगी सूचना दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अवघ्या दोन दिवसांपूर्वी सातारा रेल्वे स्थानकावरून ही डेमू बंद पडली होती. पर्यायी इंजिन जोडून ती कोल्हापूरला पाठविली. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला होता.
रेल्वे प्रशासनाने अखेरीस आता विजेचे इंजिन जोडून ही डेमू चालविण्याचा निर्णय घेतला असून, रविवारी सकाळी पुण्याहून नऊ वाजून पन्नास मिनिटांनी ही डेमू कोल्हापूरकडे रवाना झाली.
सातारा रेल्वेस्थानकावर दुपारी पावणेतीन वाजता ती दाखल झाली. तेथे निर्धारित वेळेत थांबा घेऊन ती कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली. एकंदरीत मध्य रेल्वे प्रशासनाने उशिरा का होईना, तक्रारींची दखल घेतल्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. या मार्गावर नव्या कोऱ्या आणि इलेक्ट्रिकल डेमू चालवाव्यात, अशी मागणी आता होत आहे.