दुर्दैवी घटना! सासनकाठीला बसला विजेचा शॉक, कोरेगाव तालुक्यातील युवकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 01:59 PM2022-04-19T13:59:10+5:302022-04-19T14:08:21+5:30
ग्रामदैवत जोतिर्लिंग यात्रेनिमित्त ग्राम प्रदक्षिणेसाठी आज, मंगळवारी निघालेल्या पालखी दरम्यान ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली. यात्रेमध्ये मानाच्या काठीच्या मानकऱ्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
कोरेगाव : पालखी दरम्यान सासनकाठीला ११ के.व्ही. क्षमतेच्या वीज वाहिनीचा शॉक लागून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. काठीचे मानकरी महेश बाळासाहेब माने (वय २८) असे मृत युवकाचे नाव आहे. भोसे तालुका कोरेगाव येथे ग्रामदैवत जोतिर्लिंग यात्रेनिमित्त ग्राम प्रदक्षिणेसाठी आज, मंगळवारी निघालेल्या पालखी दरम्यान ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली. यात्रेमध्ये मानाच्या काठीच्या मानकऱ्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
गेले दोन दिवस भोसे गावातील ग्रामदैवत जोतिर्लिंग यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. आज,मंगळवारी देवाची पालखी व मानाची सासनकाठीची ग्राम प्रदक्षिणा होती. मानाच्या सासन काठीचे मानकरी महेश बाळासाहेब माने यांनी यावर्षी काठी आकर्षकरित्या सजवलेली होती. त्याचबरोबर त्यास विजेच्या माळा देखील लावल्या होत्या, सकाळी ग्राम प्रदक्षिणा सुरुवात झाली.
दरम्यान महावितरण कंपनीच्या ११ के. व्ही. क्षमतेच्या वीज वाहिनीला काठीचा धक्का बसल्याने वीज प्रवाह काठीत उतरला आणि महेश माने यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
महेश हा एकुलता एक मुलगा
काठीचे मानकरी असलेल्या माने कुटुंबातील महेश हा एकुलता एक होता, त्याचे वडील सैन्य दलातून निवृत्त झाले होते. दोनच वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अविवाहित असलेले महेश माने हे शेती करत होते. प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा परिसरात नावलौकिक होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात असून, यात्रेवर या दुर्घटनेनंतर मोठे सावट आले आहे.