रस्त्यातच विद्युत वाहन करता येणार चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:50+5:302021-02-23T04:57:50+5:30
मलकापुरात चार्जिंग पॉइंट : पर्यावरण समतोलासाठी पालिकेचे प्रोत्साहन मलकापूर : येथील पालिकेने ‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत विविध उपक्रम हाती ...
मलकापुरात चार्जिंग पॉइंट : पर्यावरण समतोलासाठी पालिकेचे प्रोत्साहन
मलकापूर : येथील पालिकेने ‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पर्यावरण समतोलासाठी वृक्ष लागवड करणे आणि प्रदूषण टाळत इंधन बचतीसाठी शहरातील नागरिकांनी विद्युत वाहन वापरणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून पालिकेने चार्जिंग पॉइंट सुरू केले आहे.
या मोफत चार्जिंग पॉइंटचा नुकताच नगराध्यक्षा नीलम येडगे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. अशा प्रकारचे चार्जिंग पॉइंट आगाशिवनगर, शास्रीनगरसह शहरात विविध ठिकाणी उभारण्याचे नियोजन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
लक्ष्मीनगर येथील पालिकेच्या बहुउद्देशीय इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शासकीय पातळीवर शिवजयंती साजरी करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हा कार्यक्रम केला. याप्रसंगी मोफत चार्जिंग पॉइंटचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन व शिक्षण सभापती प्रशांत चांदे, महिला व बालकल्याण सभापती स्वाती तुपे, उपसभापती शकुंतला शिंगणे, नगरसेवक सागर जाधव, आबा सोळवंडे, किशोर येडगे, आनंदराव सुतार, नगरसेविका आनंदी शिंदे, नंदा भोसले, कमल कुराडे, गीतांजली पाटील, जयंत कुराडे, शहाजी पाटील, शशिकांत पवार, श्रीकांत शिंदे, राजेश काळे, रामभाऊ शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
- चौकट
मलकापूर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण-२०२० स्पर्धेत नागरिकांच्या सक्रिय सहभागातून आपल्या शहराला देशपातळीवर पंचविसावा, पश्चिम भारतात अकरावा, तर महाराष्ट्रात दहावा क्रमांक प्राप्त केला आहे. त्याच्या पुढे जाऊन यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०२१साठी जोमाने काम करत देशात पहिल्या पाचमध्ये येण्याची तयारी केली आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन, शहर सुशोभीकरण, दैनंदिन रस्तेसफाई, वृक्षलागवड करून शहर अजून हरित करण्याचा निर्धार केला केला आहे.