वीजबिल डॉक्टरांच्या माथी...
By admin | Published: January 1, 2016 10:22 PM2016-01-01T22:22:03+5:302016-01-02T08:28:57+5:30
खिशातून ३८ हजार भरले : पाटण पशुवैद्यकीय दवाखाना; पंचायत समितीची टाळाटाळ, वर्षभरापासूनचा प्रकार
पाटण : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीत अजूनही वीजपुरवठा जोडलेला नाही. जुन्या इमारतीतील वीजमीटरवरुन नव्या दवाखान्यात वीज वापर सुरू आहे. या वीज वापराचे बिल भरावे म्हणून वीजवितरण कंपनीने पशुवैद्यकीय दवाखान्याला नोटिसा दिल्या आणि वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा बंद करू, असा लेखी इशाराही दिला. त्यामुळे या दवाखान्याचे वीजबिल पशुधन विकास अधिकारी स्वत:च्या पगारातून भरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी ३८ हजार रुपये भरले आहेत. त्यांचे पैसे परत देण्यासाठी पंचायत
समितीचा अर्थविभाग टाळाटाळ करत आहे.
सुमारे ३८ गावांसह पाटण शहरातील पाळीव जनावरांची देखभाल व त्यांचे उपचार करणारे केंद्र म्हणजे केरा पुलानजीक असणारा पशुवैद्यकीय दवाखाना. या दवाखान्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन दीड वर्षापूर्वी अत्यंत घाई गडबडीत झाले. कारण, देसाई गटाचा सभापती असताना पाटणकर गटाने मोठ्या चतुराईने उद्घाटन
केले.
तेव्हापासून आजपर्यंत या नवीन इमारतीला नवीन वीजजोडणी मिळाली नाही. दुसरीकडे जुन्या दवाखान्याची इमारत मोडकळीस आलेली. पावसाळ्यात डॉक्टरांच्या टेबलवरच त्या इमारतीचा स्लॅब कोसळला म्हणून नव्या इमारतीत दवाखाना सुरू झाला. जुन्या इमारतीतील वीजमीटरचा वापर करून काम सुरू झाले आहे. संपूर्ण तालुक्यातील जनावरांच्या दवाखान्यास लागणारी लस या ठिकाणीच फ्रिजरमध्ये ठेवली
जाते. (प्रतिनिधी)
बँक अकाउंट नंबरची अॅलर्जी...
पाटण पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी व्ही. बी. भोसले यांनी बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी पंचायत समितीला अकाउंट नंबर दिला आहे. मात्र जिल्हा बँकेला दिलेल्या पत्रात पंचायत समिती त्यांच्या बँक अकाऊंट नंबरच जाणीवपूर्वक टाकत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
मी स्वत:च्या पगारातून पाटण पशुवैद्यकीय दवाखान्याचे वीजबिल जानेवारी २०१४ पासून भरत आहे. आत्तापर्यंत ३८ हजार रुपये भरले. त्याची वीजबीलू, पावती माझ्याकडे आहे. माझा कोणावरही आरोप नाही. फक्त मला माझे पैसे परत मिळावेत, एवढीच अपेक्षा.
- व्ही.बी. भोसले, पशुधन विकास अधिकारी वर्ग -१