वीज बिल भरमसाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:50 AM2021-02-20T05:50:10+5:302021-02-20T05:50:10+5:30
सातारा : कोरोनापासून वीज बिल माफ होईल या आशेने अनेक ग्राहकांनी वीज बिले भरलेली नाहीत. त्यांचे बिल आता डोईजड ...
सातारा : कोरोनापासून वीज बिल माफ होईल या आशेने अनेक ग्राहकांनी वीज बिले भरलेली नाहीत. त्यांचे बिल आता डोईजड होण्याच्या मार्गावर आले आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच थकीत वीज बिल असलेल्या ग्राहकांची जोडणी तोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
०००००
दुचाकी चोरीत वाढ
कोरेगाव : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकी चोरी रोखण्यासाठी काही दुचाकीस्वार घरात ठेवत आहेत. मात्र वाहनतळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
००
कोरोनाबाबत नागरिकांचे दुर्लक्ष
सातारा : कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. तरीही सातारकर दुर्लक्ष करत आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका जास्त आहे. नागरिकांनी वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
००००००
जादा टोल आकारणी
सातारा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल आकारणी करण्याबाबत निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे; मात्र दुप्पट टोल भरण्यास वाहनचालक तयार नसून ते टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. त्यामुळे जास्त वेळ समजूत घालण्यात जात आहे.
०००
नटराज मंदिरास भेट
सातारा : श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिरास पूर्णवाद परिवाराच्या लक्ष्मीकांत पारनेरकर महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग, उषा शानभाग, मंदिराचे विश्वस्त नारायण राव, मुकुंद मोघे, रणजित सावंत, रमेश हलगेकर उपस्थित होते. महाराजांनी मंदिराला विशेष स्वरुपात दे णगी दिली.
०००००००
टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा
सातारा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्वच चारचाकी तसेच अवजड वाहनांना फास्टॅग सक्तीचे केले आहे. तसेच ज्यांच्याकडे फास्टॅग नसेल त्यांना दुप्पट टोल आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी तसेच तासवडे टोलनाक्यावर गेल्या दोन दिवसांपासून वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.
०००
कोरोनामुळे चिंतेत भर
सातारा : जिल्ह्यातील पाचवी ते नववीपर्यंत वर्ग सुरू झाले आहेत. शाळेस मुलांना पाठविण्यास तयार असल्याचे पालकांनी संमती पत्रही दिले आहे; मात्र राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असल्याने पालकांच्या चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे ते मुलांना शाळेत गेल्यानंतर योग्य ती खबरदारी कशी घ्यायची हे सांगत आहेत.
०००००००००
मुलं अभ्यासात
सातारा : दहावी, बारावीचे वर्ष हे मुलांसाठी खूप महत्त्वाचे समजले जाते; मात्र यंदा कोरोनामुळे साऱ्यावर पाणी फिरले. शाळाच बंद असल्याने बहुतांश महिने घरातूनच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. आता परीक्षा काही महिन्यांवर आली असल्याने मुलं अभ्यासाला लागली आहेत. अनेकजण गावाबाहेर शांत ठिकाणी जाऊन अभ्यास करत असतात.
००
शिवजयंतीनिमित्ताने मोफत प्रवासी वाहतूक
सातारा : साताऱ्यातील शिवप्रेमी सादिक शेख यांनी शिवजयंतीनिमित्ताने सातारकरांसाठी मोफत रिक्षा वाहतुकीचा संकल्प केला होता. शुक्रवारी सकाळी त्यांनी या उपक्रमास सुरुवात केली. त्याला सातारकरांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रवाशांना मोफत वाहतूक केली जाणार असल्याचा फलक त्यांनी रिक्षाच्या पाठीमागे चिटकवला होता. तो सातारकरांचे लक्ष वेधून घेत होता.
००००
प्रदूषणामध्ये वाढ
सातारा : साताऱ्यात गेल्या वर्षी चार महिने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वच वाहने घरात असल्याने प्रदूषण कमी झाले होते. जंगली प्राणी शहरात येत होते; मात्र आता अनलॉकनंतर वाहनांचा वापर वाढला असल्याने ध्वनी व वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो.
०००००००
डोंगर बनताहेत भकास
सातारा : जिल्ह्यातील प्रमुख डोंगरांवरील गवत अज्ञात व्यक्ती वनवा लावून पेटवून देत आहेत. त्यामुळे अनेक डोंगर भकास होऊ लागले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवजंतू नष्ट झाले असून जंगलातील प्राण्यांनाही खाण्यासाठी पानं, फुलं मिळत नाही. त्यामुळे ते शहरात येत आहेत.