वीजजोडणीसाठी लाच; दोघे जाळ्यात
By admin | Published: February 10, 2015 10:19 PM2015-02-10T22:19:11+5:302015-02-10T23:57:50+5:30
एसीबीची कारवाई : महावितरणच्या उबं्रज उपविभागातील घटना
सातारा : थ्री फेज कनेक्शन जोडून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ‘महावितरण’च्या उबं्रज उपविभाग कार्यालयातील दोन कंत्राटी कामगारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोन कंत्राटी कामगारांना ताब्यात घेतले असून धनाजी येराडकर आणि अमोल शिंदे अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या दोघांनाही उबं्रज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, संबंधित तक्रारदाराच्या विहिरीवर थ्री फेज कनेक्शन हवे होते. त्यासाठी त्यांनी ‘महावितरण’च्या उंब्रज येथील उपविभाग कार्यालयात सहायक अभियंत्याकडे अर्ज केला होता. मात्र, येथील कार्यालयातून कनेक्शन हवे असेलतर दहा हजार रुपये द्यावे लगतील, असे त्यांना सांगण्यात आले होते. तक्रारदाराने याबाबतचा तक्रार अर्ज दि. ४ फेब्रुवारी रोजी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात दिला होता. या तक्रारीनुसार पडताळणी केली असता कंत्राटी कामगार तथा वायरमन मदतनीस धनाजी विश्वनाथ येराडकर (रा. भोळेवाडी, ता. कऱ्हाड, जि. सातारा) याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार येराडकर यांना दहा हजार रुपये देण्यासाठी तक्रारदार स्वत: कार्यालयात आले होते. यावेळी ही लाच कंत्राटी कामगार तथा लाईन मदतनीस अमोल बाळासाहेब शिंदे (रा. वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड) यांच्यामार्फत घेताना येराडकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
याप्रकरणी येराडकर आणि शिंदे या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)