तारळे भागातील ५६ गावांचे वीज कनेक्शन तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:26 AM2021-06-25T04:26:54+5:302021-06-25T04:26:54+5:30
सातारा : वीजबिल थकल्याने पाटण तालुक्यातील तारळे भागातील ५६ गावांचे बुधवारी दिवसभरात वीज कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ...
सातारा : वीजबिल थकल्याने पाटण तालुक्यातील तारळे भागातील ५६ गावांचे बुधवारी दिवसभरात वीज कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ही सर्व गावे अंधारात राहणार आहेत.
तारळे भागामध्ये महावितरणच्या पथदिव्यांची ८० कनेक्शन आहेत. या वीजबिलांची १ कोटी ७६ लाख २८ हजार रुपये थकबाकी आहे. यातील बुधवारी दिवसभरात ५६ गावांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे ही सर्व गावे आता अंधारात गुडूप झाली आहेत. तसं पाहिलं तर तारळे भाग हा दुर्गम भागांमध्ये मोडतो. या भागामध्ये हिंस्त्र प्राणी, साप असे प्राणी रात्री बाहेर पडतात. त्यामुळे पथदिव्यांची अत्यंत गरज असते. त्यातच सध्या पावसाळा सुरू झाला आहे. असे असताना पथदिवे बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वर्षाचा कर भरलेला असतानाही आता किती दिवस ग्रामस्थांना अंधारात बसावे लागणार, याची शाश्वती कोणालाही देता येईना. रात्री-अपरात्री काही कामानिमित्त घराबाहेर यावे लागले तर हिंस्त्र प्राण्यांचा धोका असतो. त्यामुळे पथदिवे आवश्यकच आहेत. थकीत वीजबिल भरण्यासंदर्भात महावितरणने अनेकदा संबंधित ग्रामपंचायतींना तोंडी व लेखी नोटीसही पाठवली. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी दिवसभरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गावोगावी जाऊन वीज कनेक्शन तोडली. यामुळे डोंगर वस्तीवर असणारी गावे अंधारमय झाली आहेत. थकीत वीजबिलांची रक्कम एक कोटींच्या वर असल्यामुळे ही रक्कम ग्रामपंचायतीला भरावी लागणार आहे. काही ग्रामपंचायतींनी वर्षभर वीजबिल भरले नाही. सध्या कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. त्यामुळे लोकांना दळणवळणाच्या सुविधेसाठी हे पथदिवे सुरू राहणे महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायतींनी हे वीजबिल तातडीने भरले नाही तर गावोगावी ग्रामस्थांमधून उठाव होऊन ग्रामपंचायतीवर मोर्चे काढले जातील. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी तातडीने थकीत वीजबिल भरावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
(कोट)
तारळे भागामध्ये ८० कनेक्शन आहेत. यातील ५६ गावांचे वीज कनेक्शन बुधवारी तोडण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतींनी वीजबिल भरलेले नाही. संबंधितांना वारंवार तोंडी व लेखी नोटीसही पाठवल्या. मात्र, तरीसुद्धा वीजबिल भरले नाही. त्यामुळे सरतेशेवटी आम्हाला वीज कनेक्शन तोडावे लागले. जोपर्यंत वीजबिल भरत नाहीत, तोपर्यंत आम्ही वीज कनेक्शन सुरू करणार नाही.
- आर. वाय. धर्मे, सहाय्यक अभियंता, महावितरण विभाग, तारळे, तालुका पाटण