सातारा शहरातील १५० वीज ग्राहकांची बत्ती गुल, महावितरणची कारवाई; तब्बल ७ कोटींची थकबाकी
By सचिन काकडे | Updated: March 19, 2024 19:15 IST2024-03-19T19:15:23+5:302024-03-19T19:15:39+5:30
थकबाकी भरण्याचे आवाहन

सातारा शहरातील १५० वीज ग्राहकांची बत्ती गुल, महावितरणची कारवाई; तब्बल ७ कोटींची थकबाकी
सातारा : महावितरणच्या भरारी पथकाने शहरातील थकबाकीदारांवरील कारवाई तीव्र केली असून, आज, मंगळवारी १५० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या कारवाईनंतर खडबडून जागे झालेल्या काही वीज ग्राहकांची थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची धावाधाव दिवसभर सुरू होती.
आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे अकरा दिवस उरले असून, महावितरणला १ लाख ९ हजार घरगुती ग्राहकांकडून थकबाकीपोटी तब्बल ७ कोटी ५९ लाख १५ हजार रुपये वसूल करावयाचे आहेत. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने वसुली मोहिमेला गती दिली असून, वारंवार कल्पना देऊनही वीजबिल न भरणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यासाठी महावितरणने सातारा शहरातील पाच विभागांसाठी सात भरारी पथकांची नेमणूक केली आहे.
पथकांकडून आज दिवसभरात माची पेठ, फुटका तलाव, केसरकर पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ तसेच सोमवार पेठेतील एकूण १५० घरगुती थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या कारवाईनंतर काही ग्राहकांनी तातडीने थकबाकी भरून वीजजोडणी पूर्ववत केली. दि. १ ते १९ मार्च या कालावधीत महावितरणने शहरातील तब्बल ८०० थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्राहकांनी चालू वीजबिल व थकबाकी वेळेत भरून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.