सातारा शहराची बत्ती गूल; भुयारी मार्गात पसरला काळोख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 12:45 PM2023-02-08T12:45:54+5:302023-02-08T12:46:15+5:30
ग्रेड सेपरेटरमधील (भुयारी मार्ग) दिवे दुपारपर्यंत बंद
सातारा : महावितरणने शहरातील वीजवाहिन्या व ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम काम हाती घेतल्याने सातारा शहराचा वीजपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी साडेतीन या कालावधीत बंद ठेवण्यात आला. ग्राहकांना या कामाची मेसेजद्वारे पूर्वकल्पना दिली असली तरी काही दुकानदार व व्यावसायिकांना याची झळ सहन करावी लागली.
महावितरण विभागाकडून शहरातील वीज वाहिन्या, त्यांना अडथळा ठरणा-या झाडांच्या धोकादायक फांद्या तसेच मुख्य ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल दुरुस्तीची कामे उन्हाळा सुरू होताच हाती घेतली जातात. ही कामे न केल्यास ब-याचदा वीज पुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण होतात. याची झळ ग्राहकांना बसू नये यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल मेसेजद्वारे पूर्वकल्पना देत मंगळवारी २२ केव्ही राजवाडा फिडर, २२ केव्ही पारंगे फिडर व पोवई नाका येथील ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले.
शहराच्या काही भागाचा वीजपुरवठा सकाळी ९ तर काही भागाचा ११ वाजता खंडित झाला. काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता वीज पुरवठा पूूर्ववत झाला. दरम्यान, पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरमधील (भुयारी मार्ग) दिवे दुपारपर्यंत बंद होते. त्यामुळे भुयारी मार्गात काळोख पसरल्याने वाहनचालकांना हेडलाईट लावून प्रवास करावा लागला.