साताऱ्यात उद्योजकावर वीज चोरीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:45 PM2019-07-13T13:45:58+5:302019-07-13T13:48:41+5:30
इलेक्ट्रिक पोलवरील सील तोडून वीज कनेक्शन जोडून वीज चोरी केल्याच्या आरोपावरून एका उद्योजकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : इलेक्ट्रिक पोलवरील सील तोडून वीज कनेक्शन जोडून वीज चोरी केल्याच्या आरोपावरून एका उद्योजकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विठ्ठल सदू पाटील (रा. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये विठ्ठल पाटील यांची हेम अॅग्रो इंडस्ट्रीज या नावाची कंपनी आहे. या कंपनीचे वीज बिल थकीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उच्च दाब असलेले वीज कनेक्शन तोडून इलेक्ट्रिक पोलवर सील केले होते.
या सीलचा नंबर ०२५४१९ असा होता. परंतु हेम अॅग्रो कंपनीचे मालक विठ्ठल पाटील यांनी वीज वितरण कंपनीला काहीएक न सांगता कंपनीचे थकीत बिल न भरता इलेक्ट्रिक पोलवरील सील तोडले. त्यानंतर वीज कनेक्शन जोडून कंपनीत घेतले. हा प्रकार दि. ७ रोजी उघडकीस आल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
वीज कनेक्शन तोडल्यापासून ७ जुलैपर्यंत वीजेची चोरी केल्याची फिर्याद प्रशांत यादव (वय ३८, रा. विकासनगर, खेड सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून पोलिसांनी उद्योजक विठ्ठल पाटील यांच्यावर भारतीय विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३८ (वीज चोरी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास हवालदार एस. वाय. भोसले हे करत आहेत.